पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली नवीन पीएम श्री स्कूल्स उपक्रमाची घोषणा.

 


राष्ट्रीय शिक्षक दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन पीएम श्री स्कूल्स उपक्रमाची घोषणा केली- विकसित  भारताच्या उभारणीसाठी पीएम स्कूल्स (PM ScHools for Rising India)  या योजनेअंतर्गत केंद्र सरकार देशभरात केंद्र सरकार/राज्य सरकार/ केंद्रशासित प्रदेश/ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 14,500 हून अधिक शाळा अद्ययावत आणि विकसित करण्यासाठी अर्थसहाय्य करणार आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ची सर्व उद्दिष्टे पीएम श्री स्कूल्स मध्ये दिसून येतील आणि या शाळा शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करणारे आदर्श उदाहरण तसेच आसपासच्या भागातील शाळांना मार्गदर्शक म्हणून काम करतील. गुणवत्तापूर्ण अध्यापन, अध्ययन आणि संज्ञानात्मक विकास हे या शाळांचे मुख्य उद्देश असतील, त्यासोबतच सर्वंकष आणि चौफेर गुणवत्ता असलेले तसेच 21 व्या शतकातील महत्वाची कौशल्ये आत्मसात केलेले व्यक्ती निर्माण करतील.

या शाळांमध्ये अध्यापनशास्त्र प्रयोगात्मक, सर्वंकष, एकीकृत, खेळ/खेळणी आधारीत (विशेषतः पायाभरणीच्या वर्षांत), चौकसपणा वाढविणारे, शोधांवर भर देणारे, विद्यार्थी केंद्रित, चर्चात्मक, लवचिक आणि आनंददायी असेल. प्रत्येक वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्याच्या शैक्षणिक परिणामावर विशेष लक्ष दिले जाईल. प्रत्येक पातळीवर विद्यार्थ्यांची चाचणी संकल्पनात्मक समज आणि आयुष्यातील प्रसंगांत ज्ञानाचा वापर आणि प्रत्येक विद्यार्थ्याची क्षमता यावर आधारित असेल.

या शाळांमध्ये अत्याधुनिक पायाभूत सुविधा असतील, ज्यात प्रयोगशाळा, स्मार्ट वर्ग, वाचनालये, खेळाचे साहित्य, कला दालन यांचा समावेश असेल आणि हे सर्वसमावेशक तसेच सर्वांसाठी खुले असेल. या शाळांमध्ये जल संवर्धन, कचऱ्याचा पुनर्वापर, विजेची बचत करणाऱ्या पायाभूत सुविधा आणि अभ्यासक्रमात नैसर्गिक जीवनपद्धतीचे एकत्रीकरण या सारख्या सुविधा तयार करून हरित शाळा म्हणून विकसित केल्या जातील.


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने