शेतकऱ्यांनो परमेश्वरावर अवलंबून न राहता स्वतःदेखील प्रयत्न करा; सरकार-बिरकारच्या भरवशावर राहू नका- नितीन गडकरी

ब्युरो टीम: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे बेधडक बोलतात. आपल्याच पक्षाच्या सरकारचे कान टोचतानाही ते मागेपुढे पाहत नाहीत. आताही त्यांनी तेच केले. ''मी तुम्हाला सांगतो, हे सरकार-बिरकार यांच्या फार भरवशावर राहू नका'', असा उपहासात्मक सल्ला गडकरी यांनी शेतकऱ्यांना दिला आहे.

       अॅग्रो व्हिजनच्या कार्यक्रमात बोलताना गडकरींनी फटकेबाजी केली. शेतमालासाठी बाजारपेठेचे गणित कसे जुळवून आणायचे याचे मार्गदर्शन करताना ते म्हणाले, या सरकारच्या भरवशावर राहू नका. माझे गणित मी जुळवलेय. मी ठरवलेय की, माझ्या गाडीतून दररोज माल रात्री 10 वाजता मार्केट मध्ये येईल. माझा माणूस मला 25 रुपयांच्या वर दर देतो. मला आरामात 30-40 हजार रुपये दोन दिवसाला मिळतात. माझे मार्केट मी स्वतःच शोधले. तुमचे मार्केट तुम्ही शोधा, असे गडकरी म्हणाले.

परमेश्वरावर अवलंबून नको

      फक्त परमेश्वरावर अवलंबून न राहता स्वतःदेखील प्रयत्न करावे लागतात असा संदेश देताना गडकरी म्हणाले, आपल्याकडे दोन गोष्टी आहेत. एकतर आपला विश्वास सरकारवर आहे पिंवा परमेश्वरावर आहे. मुलगा झाला तर लगेच लोक म्हणतात, अरे वा, परमेश्वराने दिला. अरे बाळा, लग्न झाल्यावर तू पुढचा काही कार्यक्रम केला नसता तर मुलगा कसा झाला असता? परमेश्वर आवश्यक आहेच, पण तुझे प्रयत्नही आवश्यक आहेत ना, असे गडकरींनी सांगताच उपस्थितांमध्ये हशा पिकला.


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने