रॉजर फेडरर व्यावसायिक टेनिसमधून निवृत्त

 

ब्युरो टीम: रॉजर फेडररने नुकतीच व्यावसायिक टेनिसमधून निवृत्ती जाहीर केली. त्याने आज सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून सर्व चाहत्यांना धक्का दिला. ट्विटरवर ऑडिओ मेसेज शेअर करुन रॉजर फेडररनं त्याच्या चाहत्यांना निवृत्तीबाबत माहिती दिली आहे. लंडनमधील पुढच्या आठवड्यातील लेव्हर कप फेडररची शेवटची टेनिस स्पर्धा असेल. रॉजरच्या या निर्णयामुळे त्याच्या जगभरातील चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. ट्विट केलेला मेसेजलाही नेटकऱ्यांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत असून त्याचं टेनिस कायम आठवणीत राहील, अशा भावना चाहत्यांनी व्यक्त केल्या आहेत.

         रॉजर फेडरर हा सध्याच्या युगातला टेनिसचा सम्राट म्हणून ओळखला जातो. त्याने 20 ग्रँडस्लॅम विजेतेपदं पटकावली आहेत.

      रॉजर फेडरर हा आपल्या शैलीदार टेनिस फटक्यांसाठी प्रसिद्ध होता. तो आपल्या सहजतेने मारलेल्या बॅकहँड फटक्यांनी प्रतिस्पर्धी खेळाडूंना अवाक करायचा. फेडररने आपल्या व्यावसायिक टेनिस कारकिर्दीत 20 ग्रँडस्लॅम जिंकले आहेत. सहा ऑस्ट्रेलियन ओपन (2004, 2006, 2007, 2010, 2017, 2018), एक फ्रेंच ओपन टायटल (2009), आठ विम्बल्डन (2003, 2004, 2005, 2006, 2007, 2009, 2012, 2017) तर पाच युएस ओपन (2004, 2005, 2006, 2007, 2008) ग्रँडस्लॅम विजेतेपदं पटकावली आहेत. त्याने 2018 ला आपले शेवटचे ग्रँडस्लॅम (ऑस्ट्रेलियन ओपन) जिंकले होते.

        विशेष म्हणजे रॉजर फेडरर 20 ग्रँडस्लॅम जिंकणारा पहिला पुरूष टेनिसपटू ठरला होता. तो जवळपास 310 आठवडे एटीपीच्या रँकिंगमध्ये अव्वल स्थानावर होता. तो तब्बल 237 आठवडे सलग रँकिंगमध्ये पहिल्या क्रमांकावर राहिला होता. सर्वाधिक आठवडे रँकिंगमध्ये टॉपवर राहण्याचा विक्रम देखील त्याच्याच नावर आहे. तसेच सलग पाच वर्षे युएस ओपन (2004 ते 2008) ग्रँडस्लॅम जिंकणारा तो एकमेव टेनिसपटू आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने