संजय शिरसाठाना मंत्रिपद मिळण्याची शक्यता धूसर ? औरंगाबाद पश्चिम मतदारसंघात भाजपचे सशक्तीकरण अभियान जोरात ; राजू शिंदे देतायत प्रत्येक बूथवर भेटी



ब्युरो टीम:औरंगाबाद पश्चिम मतदारसंघाचे आमदार संजय शिरसाट शिंदे गटात गेल्यापासून त्यांनी अनेकदा शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतली. मात्र, असे असताना त्यांच्या मतदारसंघात भाजपकडून राजू शिंदेंच्या नेतृत्वात बूथ मजबुतीकरण सुरू केले आहे. त्यामुळेच संजय शिरसाटांचा मंत्री मंडळातील पत्ता कट झाला, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.      

        आगामी निवडणुकीत भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवणार आणि विजयी होणार, असा दावा राजू शिंदेंनी केला आहे, तर राजू शिंदेंनी व्यक्त केलेले मत हे त्यांचे वैयक्तिक मत आहे. तेव्हा युतीचा जो उमेदवार असेल त्यांचा प्रचार करणार, असे आमदार संजय शिरसाट यांनी म्हटले आहे.

गेले काही दिवस भाजपचे बूथ सशक्तीकरण अभियान जोरात सुरू आहे. यात भाजपचे माजी नगरसेवक आणि 2019 चे पश्चिमचे अपक्ष उमेदवार राजू शिंदे हे पश्चिम मतदारसंघात प्रत्येक बूथवर भेट देताना दिसून येत आहेत. यातच शिवसेनेकडून पश्चिममध्ये राजू शिंदेंची तयारी सुरू असल्याची चर्चा सुरू आहे.

मतदारसंघाची परिस्थिती कशी?

        औरंगाबाद पश्चिम मतदारसंघात सर्वप्रथम 2004 साली काँग्रेसचे राजेंद्र दर्डा यांनी 1 लाख 54 हजार मते घेत शिवसेनेच्या प्रदीप जैस्वाल यांचा 7 हजार 800 मतांनी पराभव केला होता. यानंतर 2009 च्या निवडणुकीत शिवसेनेकडून संजय शिरसाट यांना उमेदवारी मिळाली, तर काँग्रेसकडून चंद्रभान पारखेंना संधी देण्यात आली. यावेळी संजय शिरसाटांना 58 हजार मते मिळाली, तर काँग्रेसला 43 हजार मते पडली. यावेळी शिवसेनेला पडलेल्या मतदानाची टक्केवार जरी वाढली असली, तरी पडलेले मतदान कमी झाले होते.

भाजपच्या अभियानाकडे लक्ष

      2014 च्या निवडणुकीत शिवसेनेने पुन्हा संजय शिरसाट यांना संधी दिली होती. यावेळी त्यांना 61 हजार मतदान झाले, तर भाजपचे उमेदवार मधुकर सावंत यांना 54 हजार मतदान पडले. यावेळी केवळ 6 हजार 900 मतांनी भाजपचा उमेदवार पराभूत झाला होता. तर शिवसेनेच्या मताची टक्केवारी 15 टक्क्यांनी घसरली होती. यानंतर 2019 ला भाजपने येथून जोरदार तयारी सुरू केली होती आणि युती झाल्याने भाजपच्या राजू शिंदेंनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आणि 43 हजारांवर मतदान घेतले मात्र यावेळी शिवसेनेकडून संजय शिरसाटांना उमेदवारी मिळाली आणि त्यांनी जोरदार मुसंडी घेत 83 हजार मते घेत 40 हजारांच्या फरकाने विजय मिळवला. यावेळी वंचितचे संदीप शिरसाट आणि एमआयएमचे अरुण बोर्डे या दोघांना अनुक्रमे 25 हजार आणि 39 हजार मतदान पडले होते. यामुळे आता भाजपच्या बूथ सशक्तीकरण अभियानाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


काय आहे संधी?

      औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघाचा परिसर भौगोलिकदृष्ट्या बराच मोठा आहे. या भागात विकासाला भरपूर वाव आहे. या भागातील जनतेचे मुख्य दु:ख पाणी, रस्ते, ड्रेनेज लाईन हे आहेत. सातारा देवळाई, पडेगाव, वडगाव, वळदगाव, बजाजनगर, यासह अेनक भागात अजूनही मुलभूत सुविधा देण्यापासून अनेक कामे बाकी आहेत.


भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवणार - राजू शिंदे

औरंगाबाद पश्चिम मतदार संघातून आमची तयारी सुरू आहे. आगामी निवडणुकीत भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढणार असून आमचाच विजय होईल, असे मत भाजपचे माजी स्थायी समीती सभापती राजू शिंदे यांनी म्हटले आहे.


राजू शिंदेंचे वैयक्तिक मत - आमदार शिरसाट

राजू शिंदे यांचे मत हे वैयक्तिक मत आहे. उमेदवारीचा निर्णय पक्ष श्रेष्ठी निवडणुकीच्या वेळेस घेतील. त्यावेळी जो निर्णय घेण्यात येईल तो आम्हाला मान्य असेल भाजप - शिवसेनेचा जो उमेदवार असेल त्यांचा आम्ही प्रचार करू, असे मत पश्चिम मतदारसंघाचे आमदार संजय शिरसाट यांनी व्यक्त केले आहे.

-----------

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने