पुण्यातून काँग्रेस कडून दोनदा आमदारकी लढवणारे रोहित टिळक भाजप प्रवेशाच्या तयारीत?



 ब्युरो टीम:  राज्यात महाविकास आघाडीचे सरकार पडून शिंदे- भाजपचे सरकार सत्तेत आले. हा सत्ताबदल झाल्यानंतर  विविध नेत्यांनी शिंदे गटाला आणि भाजपाला पाठिंबा देण्यास सुरुवात केली आहे,  अनेकांनी भाजपात प्रवेश करायला सुरुवात केली आहे.  महिनाभरापूर्वी पुण्यातील काँग्रेसचे नेते  रोहित टिळक यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांची एका कार्यक्रमात भेट घेतली होती. काल पुण्यात भाजप नेते महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची काँग्रेस नेते रोहित टिळक भेट घेतली यामुळे ते भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा पुण्याच्या राजकीय वर्तुळात आहे. 

        भाजपचा बालेकिल्ला असणाऱ्या पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस नेते रोहित टिळक यांनी दोन वेळा निवडणूक लढवली.  या  दोन्ही निवडणुकीत रोहित टिळक यांना पराभवाला सामोरे जावे लागले. सध्या या कसबा मतदार संघातून टिळक कुटुंबामधील मुक्ता टिळक या आमदार आहेत. मात्र त्या मागील काही महिन्यापासून आजारी आहेत.त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक लढण्याची शक्यता कमी आहे.

        महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे आज पशू संवर्धन आयुक्त कार्यालयामध्ये आढावा बैठकीसाठी आले होते. त्यानंतर विखे पाटील यांची पत्रकार परिषद होताच,रोहित टिळक यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेतली. यावेळी दोघांनी काही वेळ चर्चा देखील केली. या भेटीमुळे रोहित टिळक भाजपात जाणार का ? अशी चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली. 

        या भेटीबाबत रोहित टिळक यांच्या सोबत लोकसत्ता ऑनलाईनच्या प्रतिनिधीने संवाद साधला असता ते म्हणाले की, अनेक वर्षापासुन राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी परिचय आहे, अनेकदा संवाद होत असतो. त्यामुळे आजच्या भेटीमुळे कोणत्याही प्रकाराचा राजकीय अर्थ काढू नये, मी त्यांना वैयक्तिक कामासंदर्भात भेटलो असल्याचे टिळक यांनी स्पष्ट केले.


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने