ढोकळा न फाफडो, वेदांता प्रोजेक्ट आपडो... जिल्हा काँग्रेसचे निदर्शने


 

केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करीत, आमदारांवर दबाव टाकून, पैशांचे आमिष दाखवून, नैतिकता खुंटीला टांगून राज्यातील नवे सरकार अस्तित्वात आले आहे. ५० खोक्यांच्या बदल्यात महाराष्ट्राला धोके देत राज्यातल्या ईडी सरकारने वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला भेट म्हणून दिला असल्याचा घाणाघाती आरोप शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केला आहे. 

काळे यांच्या नेतृत्वाखाली लालटाकी येथे काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी शिंदे - फडणवीस सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने केली. कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी रस्त्यावर उतरले होते. यावेळी ढोकळा न फाफडो, वेदांता प्रोजेक्ट आपडो.. ५० खोके, मजेत बोके.. ५० खोके, महाराष्ट्राला धोके.. ईडी सरकारचा, धिक्कार असो...! महाराष्ट्र द्रोही सरकारचा, धिक्कार असो...! ५० खोके, माजलेत बोके... अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. काँग्रेस कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीने यावेळी परिसर दणाणून गेला होता. यावेळी निषेधाचे फलक कार्यकर्त्यांच्या हातात झळकत होते. 

काळे म्हणाले की, आम्हाला सत्ता द्या, आम्ही दरवर्षी २ कोटी रोजगार युवकांसाठी निर्माण करू, असं मोदी म्हणाले होते. ७ वर्षात सुमारे १४ कोटी रोजगार युवकांसाठी निर्माण करण्याचे त्यांचे आश्वासन होते. मात्र वस्तुस्थिती भयानक आहे. केंद्र सरकारचीच आकडेवारी आहे. २०१६ ला देशातील बेरोजगारीचा दर ३.२ % होता. २०१८ ला तो ११.०८ %, २०१९ ला १३.०८% तर या वर्षी २०२२ ला तो १३.०९ टक्क्यांवर पोहोचला आहे. ही देशातील बेरोजगारीची अभूतपूर्व परिस्थिती आहे. देशातील कोट्यावधी तरुणांना बेरोजगार करण्याचा विक्रम मोदी सरकारने केला आहे. म्हणूनच देशातील युवकांना न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधींनी भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून बेरोजगारीच्या मुद्यावर हल्लाबोल केला आहे. 

अशा नकारात्मक परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातल्या तरुणांच्या हाताला काम मिळेल अशी आशा वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पाच्या माध्यमातून निर्माण झाली होती. पुण्याजवळ त्यांचा प्रकल्प सुरू होणार होता. नगर शहराचा औद्योगिक विकास स्थानिक नेतृत्वाच्या नाकर्तेपणामुळे झालेला नाही. शहरातील तरुणाईला पोट भरण्यासाठी पुणे, मुंबईकडे जावे लागते ही वस्तुस्थिती आहे. इथे रोजगार उपलब्ध नसणाऱ्या नगर शहरातील तरुणांना देखील या प्रकल्पात मोठ्या संख्येने रोजगाराची संधी मिळू शकणार होती. मात्र गुजरातच्या होऊ घातलेल्या निवडणुकांसाठी महाराष्ट्रातल्या तरुणाईला धोका देत शिंदे - फडणवीस यांच्या ईडी सरकारने सरकारने गुजरातला वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पाची खैरात भेट म्हणून दिली आहे. यात महाराष्ट्रासह नगर शहरातील युवकांचे देखील मोठे नुकसान झाल्याचा आरोप काळे यांनी केला आहे.


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने