भारताचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) म्हणून लेफ्टनंट जनरल अनिल चौहान (निवृत्त) यांनी काल, 30 सप्टेंबर 2022 रोजी पदभार स्वीकारला. तिन्ही सैन्यदलांशी संबंधित प्रकरणांबाबत संरक्षण मंत्र्यांचे प्रधान लष्करी सल्लागार तसेच लष्करी व्यवहार विभागाचे सचिव म्हणूनही ते काम करतील. त्याचबरोबर चीफ ऑफ स्टाफ कमिटीचे ते स्थायी अध्यक्ष असतील.
पदभार स्वीकारण्यापूर्वी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना जनरल चौहान म्हणाले की चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) म्हणून नियुक्ती होणे, ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. सर्व सैन्यदले, सरकार आणि नागरिकांच्या नवीन सीडीएस कडून काही आशा आणि अपेक्षा आहेत, ज्या आपण आपल्या क्षमतेनुसार पूर्ण करू, असे त्यांनी सांगितले. तिन्ही सैन्यदले एकत्रितपणे देशासमोरच्या सुरक्षा आव्हानांशी दोन हात करतील, असेही ते म्हणाले.
तत्पूर्वी जनरल चौहान यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून हुतात्म्यांना आदरांजली वाहिली. साउथ ब्लॉक लॉन्स येथे त्यांनी हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल व्ही. आर. चौधरी, लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे, नौदल उपप्रमुख व्हाईस अॅडमिरल एस. एन. घोरमाडे आणि सशस्त्र दलातील इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत तिन्ही सैन्यदलांकडून त्यांनी मानवंदना स्वीकारली. अशी माहिती संरक्षण मंत्रालय द्वारा प्रसिध्दीस देण्यात आलेल्या पत्रात देण्यात आली आहे.
टिप्पणी पोस्ट करा