आशा पारेख यांना दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान.

 


राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज नवी दिल्ली येथे झालेल्या 68 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार समारंभात 2020 सालासाठीचे विविध श्रेणींमधील पुरस्कार प्रदान केले. यावेळी प्रतिष्ठेचा दादासाहेब फाळके पुरस्कार देखील प्रदान करण्यात आला.  यावेळी बोलताना राष्ट्रपतींनी दादासाहेब फाळके पुरस्कार प्राप्त आशा पारेख यांचे,  चित्रपटसृष्टीसाठी त्यांनी दिलेल्या विशेष योगदानाबद्दल अभिनंदन केले आणि त्यांना प्रदान करण्यात आलेला हा पुरस्कार म्हणजे महिला सक्षमीकरणाची ओळख असल्याचे सांगितले. सर्व कला प्रकारांमध्ये चित्रपटांचा प्रभाव सर्वाधिक असतो, असे नमूद करून राष्ट्रपती म्हणाल्या की चित्रपट हा केवळ एक उद्योग नाही तर आपल्या मूल्य प्रणालीची कलात्मक अभिव्यक्ती आहे. सिनेमा हे राष्ट्र उभारणीचे प्रभावी साधन देखील आहे.

पुरस्कार समारंभात टेस्टीमनी ऑफ अॅना या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट नॉन फिचर फिल्म पुरस्काराने तर सुराराई पोत्रू चित्रपटाला सर्वोत्कृष्ट फिचर फिल्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सुर्या आणि अजय देवगण यांना संयुक्तपणे सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा तर अपर्णा बालमुरली यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तान्हाजी: द अनसंग वाॅरियर चित्रपटाला, परिपूर्ण मनोरंजन देणारा चित्रपट म्हणून सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात आला.

यावेळी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर, केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्य मंत्री डॉ. एल. मुरुगन, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचीव अपूर्व चंद्रा, निवड समितीचे अध्यक्ष आणि अन्य मान्यवर हे कार्यक्रमाला उपस्थित होते.  

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने