भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंबद्दल सोशल मीडियावर अर्वाच्य भाषा , या जिल्ह्यात झाला गुन्हा दाखल

 


ब्युरो टीम : भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबद्दल फेसबुकवर अर्वाच्य भाषेचा वापर केल्याने संदीप खामकर (पूर्ण नाव उपलब्ध नाही, रा. निबोंडी ता. जि अहमदनगर ) या युवकावर अहमदनगर जिल्ह्यातील  भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  याप्रकरणी भाजपचा कार्यकर्ता ज्ञानेश्वर प्रभाकर काळे यांनी  फिर्याद दिली आहे.

फिर्यादीत म्हंटले आहे की, 'सोमवारी (दि. 12) माझे घरी तेलीखुंट अहमदनगर येथे असताना रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास माझे मोबाईलवर फेसबुक पाहत होतो. त्यावेळी आमचे भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष व आमदार चंद्रशेखर बावनकुळे(chandrshekhar Bawankule) यांच्या  फेसबुक पेजला मी जॉईन असून मी फेसबुक पाहत  असताना संदीप खामकर याने आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या फेसबुकला अर्वाच्य भाषा वापरून दोन गटात तेढ निर्माण होईल असे क्रुत्य केले आहे. तेथे आमचे भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष यांची प्रतिमा मलिन होईल, असा मजकूर लिहीला आहे. याबाबत मी आमचे पक्षाचे जिल्हाध्यक्ष भैया गंधे, उपाध्यक्ष बाबासाहेब सानप, सरचिटणीस तुषार पोटे, सुमित बटुळे, संतोष गांधी, वसंत राठोड यांना घटनेबाबत माहिती दिली,' असेही फिर्यादीत म्हंटले आहे.

काळे यांच्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात संदीप खामकर या युवकावर भादंवि कलम ५०५(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिसांनी सुरू केला आहे. दरम्यान फिर्याद देण्यासाठी भाजपाचे ज्ञानेश्वर काळे, भिंगार छावणी परिषदेचे उपाध्यक्ष वसंत राठोड यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते पोलीस ठाण्यात ठाण मांडून बसले होते.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने