दसरा मेळावा वादात बिचुकलेंची उडी, म्हणाले आता माझी वेळ आली..

ब्युरो टीम : 'आपण आता सणासुदीचे दिवस सोडून मेळावे घेणार असून महाराष्ट्रातील समाजाच्या भल्यासाठी काम करणार आहे. मी कधीही दसरा मेळावा करणार नाही. मी दसरा, दिवाळी, गुडीपाडवा हे सोडून माझे मेळावे घेईन. आता माझी वेळ आली महाराष्ट्रासाठी काहीतरी करण्याची. प्रत्येकाचा काळ असतो. सर्वांचा काळ गेला. आता अभिजित बिचुकले येईल,' असे वक्तव्य अभिजित बिचुकले यांनी करीत राज्यात सुरू असलेल्या दसरा मेळावा वादात उडी घेतली आहे. ते सातारा येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

दसरा अवघ्या काही आठवड्यांवर आलेला असतानाच मुंबईतील दादरमधील शिवतीर्थावर यंदाचा दसरा मेळावा कोण घेणार यावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील फुटीर आमदारांचा गट विरुद्ध उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना असे दावे-प्रतिदावे केले जात आहेत. दोन्ही बाजूने आम्हीच यंदा दसरा मेळावा घेणार असं सांगितलं जात आहे. असं असतानाच आता या वादामध्ये आपल्या हटके विधानांसाठी लोकप्रिय असणारा अभिनेता अभिजित बिचुकलेने उडी घेतली आहे. कोणीही कोणत्याही नेत्याच्या दसरा मेळाव्यासाठी जाऊ नये असं आवाहन केलं आहे. इतकच नाही तर यावेळी बिचुकलेने मुख्यमंत्री शिंदेंचा उल्लेख “आता कोण दुसरे आलेत” असा केला आहे.

बिचुकले यांना दसरा मेळाव्यासंदर्भातील त्याचं मत विचारले असता ते म्हणाले, 'दसरा मेळाव्याबद्दल मी एकच सांगेन, सदविवेक बुद्धी असणाऱ्या कुठल्याही व्यक्तीने कोणत्याही नेत्याचं भाषण ऐकण्यासाठी घराबाहेर पडू नये. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणाऱ्या हा सण तुम्ही तुमच्या घरी कुटुंबियांबरोबर, समाजाबरोबर आणि मित्र तसेच सहकाऱ्यांसोबत साजरा करा,' असे सांगतानाच दसरा मेळावा घेणाऱ्या राजकारण्यांवर टीका करताना ते म्हणाले, 'हे जे लोक कोल्हेकुई करतात, नालायकपणा करतात त्यांचे विचार सांगून स्वत:ची खळगी भरतात. त्यांच्या नातवंडांपर्यंत ते सुखी राहतात. आता कोण दुसरे आलेत ते ही दसरा मेळावा घ्या म्हणायला लागले आहेत,' असा टोलाही त्यांनी  शिंदे गटाला लगावला.

दसरा मेळाव्याचा नेमका वाद काय ? 


मुंबईतील दादरमधील शिवतीर्थावर दरवर्षी शिवसेनेचा दसरा मेळावा होत असतो. या मेळाव्याला खूप मोठी परंपरा आहे. राज्यभरातून शिवसैनिक या मेळाव्याला येत असतात. यंदा मात्र शिवसेनेत फूट पडली आहे. त्यामुळे यंदाचा दसरा मेळावा कोण घेणार, यावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील फुटीर आमदारांचा गट विरुद्ध उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना असे दावे-प्रतिदावे केले जात आहेत. दोन्ही बाजूने आम्हीच यंदा दसरा मेळावा घेणार, असं सांगितलं जात आहे. असं असतानाच आता या वादामध्ये  अभिजित बिचुकलेने उडी घेतली आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने