मुंबईकरांसाठी पुढील काही तास महत्वाचे, हवामान खात्याने दिलाय पावसाचा इशारा


ब्युरो टीम :  भारतीय हवामान विभागाने आज संध्याकाळी मुंबईत विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवली आहे. तसेच मुंबई आणि परिसरात पुढील तीन दिवस काही ठिकाणांवर मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज  हवामान विभागाने वर्तवला आहे.
मुंबई, कोकणासह राज्यातील विविध भागांमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये मुसळधार पावसाचा तडाखा बसला आहे. त्यातच आता दक्षिण ओडिशाच्या किनारपट्टीभागात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने राज्यात मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पुढील पाच दिवसांमध्ये राज्यातील विदर्भ आणि कोकणात मुसळधार पाऊस पडेल. तर, विदर्भात विजांच्या कडकडाटासह ११, १२ आणि १३ सप्टेंबर असे तीन दिवस मुसळधार पाऊस कोसळणार आहे. याशिवाय मराठवाडा भागात आज ११ सप्टेंबर आणि उद्या १२ सप्टेंबर रोजी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
विदर्भात  आज अमरावती, वर्धा, चंद्रपूर आणि यवतमाळमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. या बरोबरच विदर्भात अनेक ठिकाणी मध्यम स्वरुपाच्या पाऊस कोसळणार आहे. हवामान विभागाने मराठवाड्यासाठी ऑरेंज अलर्ट दिला असून नांदेड आणि हिंगोलीत काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावस होईल, असा अंदाज वर्तवला आहे.
दरम्यान, पुढील पाच दिवसात पावसाचा जोर वाढणार असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आलंय.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने