कॉमेडी बादशाह राजू श्रीवास्तव काळाच्या पडद्याआड

 



ब्युरो टीम : प्रसिद्ध स्टँड-अप कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचे आज २१ सप्टेंबर २०२२ रोजी निधन झाले. ते ५८ वर्षांचे होते. दिल्लीतील एम्समध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या ४० दिवसांपासून ते रुग्णालयात दाखल होते. 

जिममध्ये व्यायाम करत असताना राजू यांना हृदयविकाराचा झटका आला होता. मागील महिन्यात त्यांच्या नियमित दिनचर्येनुसार, ते सकाळी जिममध्ये व्यायाम करत होते. ट्रेडमिलवर चालत असताना अचानक त्यांच्या छातीत दुखू लागले. त्यांची प्रकृती पाहता त्यांना तातडीने दिल्लीच्या एम्समध्ये दाखल करण्यात आले. मात्र आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काल, मंगळवारी राजू श्रीवास्तव यांची अँजिओग्राफीही करण्यात आली, ज्यामध्ये त्यांच्या हृदयाच्या मोठ्या भागात १०० टक्के ब्लॉकेज आढळून आले होते.

राजू श्रीवास्तव हे बी-टाउनमधलं एक प्रसिद्ध नाव होतं. त्यांनी अनेक चित्रपट आणि शोमध्ये काम केलं. राजू रिअॅलिटी शोमध्येही सहभागी झाले होते. 'द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज' या कॉमेडी शोमधून राजूला ओळख मिळाली. या शोच्या यशानंतर राजूने मागे वळून पाहिलेच नाही. राजू श्रीवास्तव एक अभिनेते होते. ते भाजपशीही संबंधित होते. कोणत्याही गॉडफादरशिवाय राजू यांनी इतके यश मिळवले हे पाहणं प्रेरणादायी आहे. ते केवळ विनोदी कलाकारच नाही तर अभिनेते आणि राजकारणीदेखील होते. १९८८ मध्ये छोट्या भूमिकांमधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारे राजू श्रीवास्तव सलमान खानच्या 'मैंने प्यार किया' सिनेमात दिसले होते. नंतर त्यांनी आणखी काही सिनेमे केले आणि नंतर कॉमेडीमध्ये प्रवेश केला. त्यांना द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज, कॉमेडी का महामुकाबला यांसारख्या शोमधून ओळख मिळाली. ते 'बिग बॉस ३' आणि 'नच बलिए' सारख्या शोमध्येही दिसले होते.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने