स्व.अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या निधीत वाढ करणार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 


समाजातील सर्व घटकांना न्याय देणारे हे सरकार आहे. माथाडी कामगाराच्या घरांचा, त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा तसेच वैद्यकीय सुविधांचा प्रश्न सोडवण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. मराठा समाजात नव उद्योजक तयार व्हावेत यासाठी स्व. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या निधीत वाढ केली जाईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. माजी आमदार स्व. अण्णासाहेब पाटील यांच्या ८९ व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनच्या वतीने तुर्भे येथील एपीएमसी मार्केटमध्ये आयोजित माथाडी कामगार मेळावा व पुरस्कार वितरण सोहळा झाला. त्यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते.

माथाडी कामगारांचे अनेक रखडलेले प्रश्न पुढील काळात मार्गी लावण्यात येतील. माथाडी कामगारांना हक्काचे घर मिळावे यासाठी कोणतीही अडचण येणार नाही. यासाठी मुंबई बँकेच्या मदतीने निधी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करू. मराठा समाजाला न्याय देण्यासाठी उपसमिती स्थापन झाली आहे. तसेच मराठा युवकांच्या शासकीय नोकरीत नियुक्तीसाठी अधिसंख्य पदे निर्माण केली असून नियुक्ती प्रक्रिया सुरू केली आहे. स्व. अण्णासाहेब पाटील महामंडळ व सारथी संस्थेच्या माध्यमातून मराठा समाजात नवीन उद्योजक तयार होण्यासाठी अनेक योजनांवर राज्य शासन काम करत असून, महामंडळाची जबाबदारी पुन्हा एकदा माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील यांच्यावर सोपविण्यात येईल, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.

उपमुख्यमंत्री श्री फडणवीस म्हणाले की, मागील २०१४ ते २०१९ च्या काळात माथाडी कामगारांच्या अनेक प्रश्नांवर सकारात्मक निर्णय घेतले. अनेक प्रश्न सोडविले. या काळात स्व.अण्णासाहेब पाटील महामंडळाला पुनरुज्जीवित केले. त्यामाध्यमातून मागील काळात ५० हजार मराठा तरुणांना उद्योजक होण्याची संधी मिळाली. माथाडी कामगाराच्या घराचा प्रश्न सोडविणे कठीण होते. पण जास्तीचा एफएसआय देऊन तो प्रश्न मार्गी लावला. या पुढील काळातही यासाठी निधी कमी पडू देणार नाही. माथाडी कामगारांचे उर्वरित प्रश्न निश्चितपणे सोडविल्याशिवाय राहणार नाही. नाशिकच्या लेव्हीचा प्रश्नही बैठक घेऊन लवकरच सोडविणार आहे. माथाडी कामगारांच्या चळवळीच्या मागे आपण भक्कमपणे उभे आहोत. माथाडी कामगार संघटनामध्ये घुसलेल्या अपप्रवृत्ती विरोधात कठोर कारवाई करण्यात येईल, असेही उपमुख्यमंत्री म्हणाले.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कामगार मंत्री सुरेश खाडे, आमदार प्रवीण दरेकर, आमदार निरंजन डावखरे, आमदार छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार गणेश नाईक, आमदार मंदा म्हात्रे, आमदार महेश शिंदे, माजी आमदार नरेंद्र पाटील, माजी खासदार संजीव नाईक, माजी आमदार संदीप नाईक, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक डक आदी उपस्थित होते. यावेळी माथाडी भूषण पुरस्काराचे वितरण मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते करण्यात आले.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने