महापालिका निवडणुकीत नवी समीकरणे भाजप- मनसे एकत्र येणार ; अमित शहा राज ठाकरेंना भेटणार?


ब्युरो टीम: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे लालबागचा राजा तसेच सिद्धिविनायकांच्या दर्शनासांठी मुंबई दौऱ्यावर येत आहे. शहा यांच्या या दौऱ्यात भाजप-मनसे युतीची घोषणा होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

        भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा हे देखील अमित शहासोबत दोन दिवसीय दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात आगामी निवडणुका भाजप आणि मनसे सोबत लढवणार असल्याची घोषणा होण्याची शक्यता आहे.

       भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यापाूसन गणेशोत्सवात अमित शहा लालबागच्या राज्याच्या दर्शनासाठी मुंबईत येत असतात. मात्र, यंदा त्यांचा दौरा हा राजकीय दृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहे. दोन दिवस मुंबईत असणारे केंद्रीय गृहमंत्री राज्यातील राजकीय नेत्याचा घरी देखील बाप्पाचे दर्शन घेणार आहेत. यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांसह शेलारांच्या घरी जात बाप्पाचे दर्शन घेणार आहेत. भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत भाजप ‘मिशन मुंबई महापालिका’चा शुभारंभ करणार असल्याचीही माहिती समोर येत आहे.

मुंबई मनपाची तयारी?

       गेली 25 वर्षे मुंबई मनपाची सत्ता एकहाती शिवसेनेच्या ताब्यात आहे. मात्र, यंदा भाजपकडून मुंबई मनपावर भाजपचा झेंडा फडकवण्यासाठी जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. यात भाजप मनपासाठी मनसेला सोबत घेणार असल्याची चर्चा आहे. अमित शहा यांच्या दौऱ्यात भाजप - मनसे युतीच्या प्रचाराचा श्री गणेशा होईल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

भाजपचे नेते राज ठाकरेंच्या भेटीला

    गेली काही दिवस राज्यातील सत्ताधारी नेते राज ठाकरेंच्या भेटीला जात आहे. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राज ठाकरेंची भेट घेत बराच वेळ चर्चा केली होती. यावेळी बोलताना बावनकुळेंनी मनसे सोबतच्या युतीचा निर्णय देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा घेतील असे म्हटले होते. यानंतर आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबईच्या दौऱ्यावर येणार असून ते राज ठाकरेंसोबत युतीची घोषणा करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

राजकीय बैठकी होणार

      उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अमित शहा यांच्या विचारांचा आणि भेटीचा आम्हाला लाभ व्हावा म्हणून राजकीय बैठकाही होणार आहेत. राज्यातील महापालिका निवडणूक आणि मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने अमित शहा भाजपची रणनिती ठरवीतल. या बैठकीला माझ्यासह चंद्रशेखर बावनकुळे हे उपस्थित असतील असे मत फडणवीसांनी व्यक्त केले आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने