अरे आवाज कुणाचा ..... अरे करंडक कुणाचा म्हणत पुरुषोत्तम’च्या अंतिम फेरीला जल्लोषात सुरुवात



ब्युरो टीम:‘अरे आव्वाज कुणाचा...’, ‘अरे करंडक कुणाचा...’ अशा घोषणा देत आपल्या संघाला प्रोत्साहन देणारे महाविद्यालयीन विद्यार्थी... दडपण बाजूला सारत सर्वोत्तम सादरीकरण करण्यासाठी धडपडणारे संघातील तरुण-तरुणी आणि रंगभूमीच्या भावी शिलेदारांचे मनोबल वाढवण्यासाठी आलेले दिग्गज रंगकर्मी... यांच्या उपस्थितीत जल्लोषात काल पुरुषोत्तम करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीला सुरुवात झाली.

        महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित या आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी सदाशिव पेठेतील भरत नाट्य मंदिर येथे सुरु आहे. अंतिम फेरीतील नऊ एकांकिकांपैकी तीन एकांकिकांचे शनिवारी (ता. १७) सायंकाळी ५ ते ८ या सत्रात सादरीकरण झाले. फेरीला प्रारंभ होण्यापूर्वीच नाट्यगृह हाऊसफुल्ल झाले होते. यात आपल्या महाविद्यालयाच्या संघाला प्रोत्साहन द्यायला आलेले विद्यार्थी, दिग्गज रंगकर्मी यांच्यासह नाट्यप्रेमी रसिकांची उपस्थिती पाहायला मिळाली.

         या फेरीची सुरुवात फर्ग्युसन महाविद्यालयाच्या ‘आद्य’ या एकांकिकेच्या सादरीकरणाने झाली. त्यानंतर मॉडर्न कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालय, शिवाजीनगर यांची ‘गाभारा’ ही एकांकिका सादर झाली. तर, मॉडर्न महाविद्यालय, गणेशखिंड यांच्या ‘अहो, ऐकताय ना?’ या एकांकिकेने शनिवारच्या सत्राचा समारोप झाला. आता रविवारी (ता. १८) दोन सत्रांमध्ये उर्वरित सहा संघांच्या एकांकिकांचे सादरीकरण होणार आहे. सर्व संघांचे सादरीकरण झाल्यानंतर रविवारी (ता. १८) रात्रीच निकालाची घोषणा करण्यात येईल.



आज सादर होणाऱ्या एकांकिका -


सकाळचे सत्र - ९ ते १२ -


१) टिकाराम जगन्नाथ महाविद्यालय, पुणे - ‘काय झाडी, काय डोंगार, काय हाटील’


२) कमिन्स अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे - ‘चाराणे’


३) पीआयसीटी महाविद्यालय, पुणे - ‘कलिगमन’


सायंकाळचे सत्र - ५ ते ८ -


१) तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय, बारामती - ‘भू भू’


२) डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय, आकुर्डी - ‘एक्स्पायरी डेट’


३) अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे - ‘ओंजळभर चंद्र’

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने