अभिनेता अमित रेखींची चाहत्यांना भुरळ;'भाग्य दिले तू मला' ही मालिकेत आदित्य मोहितेंच्या रूपात चाहत्यांना भावतोय



ब्युरो टीम: कलर्स मराठी वाहिनीवरील 'भाग्य दिले तू मला' ही मालिका खूप लोकप्रिय होत आहे. त्यात आदित्य मोहिते ही व्यक्तिरेखा लोकांना प्रचंड आवडत आहे .अमित रेखी या अभिनेत्याने  ही भूमिका साकारली आहे . एक प्रॉमिसिंग चेहरा …

    अमित रेखी मूळचा नगरचा. लहानपणापासून त्याने सातत्याने वत्तृत्व स्पर्धा, अभिनय स्पर्धा यामधून बक्षिसे मिळवली आहेत. शाळेत असताना वेशभूषा स्पर्धेत काहीतरी हटके वेशभूषा करून तो बक्षीस मिळवायचा. त्याने शाळेत असताना 'चिल्ड्रेन ऑफ हेवन' नाटकातदेखील भूमिका केली होती. दहावीनंतर अमितने न्यू आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स कॉलेजमध्ये कॉमर्सला प्रवेश घेतला. अमित बारावीला कॉलेजमधून दुसरा आला होता. त्याच्या आयुष्यातील एक नवीन वळण आलं, ते एफ. वाय.ला असताना. वर्गात एकदा 'आम्हाला एकांकिका करण्यासाठी कलाकार हवे आहेत,' असा निरोप आला. त्याने ऑडिशन दिली. मग 'दोन रात्रीचा उत्तरार्ध' या एकांकिकेत त्याने भूमिका केली. त्यानंतर पुरुषोत्तम करंडकसाठी त्याच वर्षी अमितच्या कॉलेजने 'माईक' नावाची संदीप दंडवते लिखित दिग्दर्शित एकांकिका सादर करून सदतीस वर्षांनंतर नगरला पुरुषोत्तम करंडक जिंकून दिला. पुढे या एकांकिकेचे जवळजवळ 50 प्रयोग ठिकठिकाणी सादर झाले. नाटय़मल्हार प्रतिष्ठान या संस्थेतर्फे अनेक एकांकिकातून, नाटकातून अमितचा सहभाग होता. 'रंगबावरी एकांकिकेची प्रकाशयोजना त्याने केली होती. राज्य नाटय़ स्पर्धेत 'दि ग्रेट एक्स्चेंज' हे नाटक नगर केंद्रातून प्रथम आलं. 2017 साली आलेल्या 'माज' या चित्रपटात, तसेच नुकतेच ओटीटीवर प्रदर्शित झालेल्या 'साजिंदे' चित्रपटात अमितची प्रमुख भूमिका होती.

         अमितने 'अय' नावाची एकांकिका नगर करंडक स्पर्धेत सादर केली होती. अमितला गायनाची आवड आहे. मालिकेच्या सेटवर तो आणि निवेदिता जोशी सराफ या सध्या 'मृत्युंजय' या कादंबरीचे वाचन करत आहेत. लवकरच त्याचा 'सफरचंद' हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्याच्या या यशामध्ये त्याचे गुरू संदीप दंडवते यांचा महत्त्वाचा वाटा आहे हेही तो सांगतो .

        'भाग्य दिले तू मला'मधील भूमिकेविषयी अमित म्हणतो, 'यातील मी साकारत असलेला आदित्य मोहिते हा खूप समंजस वृत्तीचा आहे. आपल्या काकीला सपोर्ट करणारा, समाधानी वृत्तीचा, कविता करण्याची आवड असणारा आहे. या भूमिकेमुळे माझ्या चेहऱयाला खऱया अर्थाने ओळख दिली आहे. अल्पावधीतच मला अनेक चाहते या भूमिकेनं मिळाले.'

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने