भारत जोडो यात्रेसाठी शहर काँग्रेस राहुल गांधींना सुपुर्त करणार ऐतिहासिक नगरच्या पवित्र मातीचा कलश.

 


          ब्युरो टीम : अहमदनगर शहर हे शहाजीराजे भोसले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक, पं. नेहरू, सरदार पटेल, सावित्रीबाई फुले, फातिमा शेख, लहुजी वस्ताद, अण्णाभाऊ साठे अशा अनेक महापुरुष, थोर व्यक्तिमत्त्वांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. शहरातील त्या सर्व ठिकाणांची पवित्र माती संकलित करुण त्याचा कलश भारत जोडो यात्रेसाठी निघालेल्या खा.राहुल गांधींना देणार असल्याची घोषणा, काँग्रेसचे नेते शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केली आहे. 

        ७ सप्टेंबर पासून कन्याकुमारी येथून राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेला सुरुवात केली असून १५० दिवसात ३५७० किमी ते स्वतः काँग्रेस कार्यकर्त्यां समवेत महाराष्ट्रासह १२ राज्य, २ केंद्रशासित प्रदेशांमधून पायी प्रवास करत कश्मीर येथे यात्रेचा समारोप करणार आहेत. महाराष्ट्राच्या नांदेड, हिंगोली, बुलढाणा, जळगाव या जिल्ह्यांमधून हि भारत जोडो यात्रा जाणार आहे. 

        काँग्रेसचे नेते शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या संकल्पनेतून माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली  या यात्रेच्या अनुषंगाने शहरात विविध कार्यक्रम राबविणार असून नगरच्या ऐतिहासिक पवित्र मातीचा कलश आ.थोरात यांच्याकडे काँग्रेसचे नेते किरण काळे हे सुपूर्द करणार आहेत. आ.थोरात तो कलश राहुल गांधी यांना शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने सुपुर्द करणार आहेत. 

        नगरच्या ऐतिहासिक पवित्र मातीचा कलश संकलित करण्यासाठी शहराच्या विविध भागात पुढील दोन महिने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शहाजीराजे भोसले यांनी भेट दिलेला मुकुंदनगरचा शहाशरीफ दर्गा, छत्रपती शिवाजी महाराजांशी आणि भोसले परिवाराशी निगडीत असणारे बाजारपेठेतील अमृतेश्वर शिवालय मंदिर, डॉ. आंबेडकरांनी भेट दिलेले माळीवाडा येथील लक्ष्मीआई मंदिर, पं. नेहरू, पटेल यांच्यासह अनेक थोर स्वातंत्रसेनानी अटकेत असलेला भुईकोट किल्ला, टिळकांनी भेट दिलेली इमारत कंपनी या ठिकाणची माती कलशासाठी संकलित केली जाणार आहे. 

        त्याचबरोबर सावित्रीबाई फुले, फातिमा शेख यांनी अध्ययनाचे धडे गिरविलेली मराठी मिशनची क्लेरा ब्रूस शाळा, पटवर्धन बंधू, थोर स्वातंत्र्य सैनिकांच्या अंगणातील माती, शहरातील मंदिर, मस्जिद, चर्च, गुरुद्वारे यासह सर्व जाती-धर्मीयांची धार्मिकस्थळे, स्नेहालय, अनाम प्रेम, सावली, माऊली या सामाजिक संस्थांच्या आवारातील माती या कलशासाठी संकलित केली जाणार असल्याचे काळे यांनी म्हटले आहे. 

        सांस्कृतिक क्षेत्रतील सदाशिव अमरापुरकर, शाहू मोडक, मधुकर तोरडमल, व्हीआरडीई संशोधन संस्था, चांदबिबी महल, राजर्षी शाहू महाराजांनी सुरू केलेले बोर्डिंग, चौथे शिवाजी महाराज स्मारक, शहरातील विविध शाळा, महाविद्यालये, शेतकऱ्यांची कामधेनु असणारी जिल्हा सहकारी बँक, महावीर कलादालन आवारातील माती देखील संकलित केली जाणार आहे. या माध्यमातुन २१ व्या शतकातील ऐतिहासिक भारत जोडो यात्रेशी नगर शहर देखील जोडले जाणार असल्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असल्याचे किरण काळे यांनी म्हटले आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने