Cricket Pak Vs SL: आशिया कप २०२२ चा अंतिम सामना आज होणार.

 

        आशिया कप २०२२ चा अंतिम सामना आज होणार आहे. या सामन्यानंतर T20 Cricket मध्ये आशियाला नवा चॅम्पियन मिळणार आहे. दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होणारा हा सामना पाच वेळचा चॅम्पियन श्रीलंका आणि दोन वेळचा विजेता पाकिस्तान  यांच्यात होईल. या सामन्यात  पाकिस्तानला 10 वर्षांनंतर विजेता बनण्याची संधी आहे. तर श्रीलंकेला जिकंली तर 8 वर्षांनंतर विजेतेपदाचा मुकुट मिरवणार आहे.

        आशियाचा विश्वचषक म्हटल्या जाणार्‍या या स्पर्धेत 6 संघांनी गेल्या 16 दिवसांत 13 सामन्यांत आपली ताकद दाखवली आहे. पाकिस्तानची कामगिरी कागदावर भारी दिसत असून पाकिस्तानचे पारडे जड असल्याचे दिसते. या पुर्वी दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत 22 सामने झाले आहेत. यापैकी पाकिस्तानने 13 आणि श्रीलंकेने 9 जिंकले आहेत. आशिया चषकाबाबत बोलायचे तर दोन्ही संघ तिसऱ्यांदा अंतिम फेरीत समोरा समोर येणार आहेत. दोन्ही संघ अंतिम फेरीत यापुर्वी 2014 मध्ये खेळले होते ज्यात श्रीलंका संघाने बाजी मारली होती.

        दुबई इंटरनॅशनल स्टेडियमच्या खेळपट्टीबद्दल बोलायचे झाले तर, येथे धावसंख्येचा पाठलाग करणाऱ्या संघाने बहुतांश सामने जिंकले आहेत. दुबईत आततापर्यंत या  मोसमात आठ सामने खेळले आहेत. यातील सहा सामने धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाने जिंकले आहेत. तर दोन विजय बचाव करणाऱ्या संघाच्या वाट्याला आले आहेत. येथे भारताने हाँगकाँगचा 40 धावांनी तर अफगाणिस्तानचा 101 धावांनी पराभव केला. उर्वरित 6 सामन्यांमध्ये पाठलाग करणाऱ्या संघाने विजय मिळवला आहे. अशा स्थितीत नाणेफेक जिंकणाऱ्या संघ प्रथम गोलंदाजी करणे पसंत करेल असे दिसते. दुबईच्या खेळपट्टीवर सरासरी धावसंख्या 150-180 धावांची आहे. मात्र, एक सामना  कमी धावसंख्येचा देखील झाला आहे. अशा स्थितीत अंतिम फेरीत प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाकडून  150-180 धावांची धावसंख्या अपेक्षित आहे.

        अंतिम सामन्यात चाहत्यांच्या नजरा दोन्ही संघांच्या आघाडीच्या फळीवर असतील. मोहम्मद रिझवान पाकिस्तानसाठी चांगली कामगिरी करत आहे. त्याचवेळी कर्णधार बाबर आझमही गेल्या सामन्यात रंगात दिसला. बाबरने 30 धावांची खेळी खेळली. तर श्रीलंकेचा सलामीवीर पथुम निसांकाने (55) पाकिस्तानविरुद्ध अर्धशतक झळकावले. पाकिस्तानच्या गोलंदाजांची कामगिरीही महत्वाची असेल. तसेच गेल्या सामन्यातील सामनावीर ठरलेल्या श्रीलंकेच्या वनिंदू हसरंगा यावर सर्वांची नजर असेल. हसरंगाने 21 धावांत तीन बळी घेतले होते तसेच 2 झेल टिपले होते.

        संभावित संघ पाकिस्तान : बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान, फखर जमान, हैदर अली, आसिफ अली, खुशदिल शाह, शादाब खान, मोहम्मद नवाज, हसनैन, हरिस रौफ, नसीम शाह.

        संभावित संघ श्रीलंका : पाथुम निसांका, कुसल मेंडिस, चरित अस्लंका, दानुष्का गुनाथिलका, भानुका राजपक्षे, दासुन शनाका (कर्णधार), वनिंदू हसरंगा, चमिका करुणारत्ने, महेश थिक्शाना, असिता फर्नांडो, दिलशान मदुशंका.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने