Engineers Day: दरवर्षी15 सप्टेंबरला का साजरा केला जातो अभियंता दिवस.

 


दरवर्षी 15 सप्टेंबर हा भारतात अभियंता दिन (engineers day) म्हणून साजरा केला जातो. हा दिवस भारताचे महान अभियंता आणि भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरैया (Sir Mokshagundam Vishveshwaraya ) यांचा वाढदिवस आहे.  मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा जन्म 15 सप्टेंबर 1860 रोजी म्हैसूर (कर्नाटक) राज्यातील कोलार जिल्ह्यातील चिक्कबल्लापूर येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव श्रीनिवास शास्त्री आणि आईचे नाव व्यंकचम्मा होते. विश्वेश्वरयांनी आपले प्रारंभिक शिक्षण चिक्कबल्लापूर येथून पूर्ण केले. पुढील शिक्षणासाठी त्यांनी बंगळुरूच्या सेंट्रल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. पण येथे त्यांना पैशांची कमतरता भासत होती, त्यामुळे त्यावेळी त्यांनी शिकवणीचे देखील काम केले . विश्वेश्वरय्या 1881 मध्ये बीए परीक्षेत अव्वल आले यानंतर, म्हैसूर सरकारच्या मदतीने त्यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण घेण्यासाठी पुणे येथील विज्ञान महाविद्यालयात प्रवेश घेतला. 1883 मध्ये KCIE, FASc  (सध्याची बीई पदवी) परीक्षां मध्ये प्रथमस्थान मिळवून त्यांनी त्यांची गुणवत्ता सिद्ध केली.

अभियांत्रिकीचे शिक्षण घेतल्यानंतर त्यांना मुंबईच्या पीडब्ल्यूडी विभागात नोकरी मिळाली, नोकरी मध्ये असताना त्यांनी दख्खनच्या पठारात एक सिंचन व्यवस्था कार्यान्वित केली. अनेक संसाधने आणि उच्च तंत्रज्ञानांची कमतरता असताना देखील त्यांनी अनेक प्रकल्प यशस्वी करून दाखवले. याशिवाय नंतर ते  कृष्णराजसागर धरण, भद्रावती आयर्न अँड स्टील वर्क्स, म्हैसूर सँडल ऑइल अँड सोप फॅक्टरी, म्हैसूर युनिव्हर्सिटी आणि बँक ऑफ म्हैसूर ह्या संस्थाचे प्रमुख  या नात्याने देखील उल्लेखनीय कार्य केले.  वयाच्या ३२ व्या वर्षी सुक्कूर (सिंध) महानगरपालिकेत काम करत असताना त्यांनी सिंधू नदीतून सुक्कूर शहराला पाणीपुरवठा करण्याची योजना तयार केली ज्याची बरीच प्रशंसा झाली .

ब्रिटिश सरकारने सिंचन व्यवस्था सुधारण्यासाठी एक समिती स्थापन केली होती. त्यांना या समितीचे सदस्य करण्यात आले. धरणासाठी त्यांनी  नवीन ब्लॉक पद्धतीचा शोध लावला, त्याअंतर्गत त्यांनी धरणाकरीत स्टीलचे दरवाजे बनवले ज्यामुळे धरणातील पाण्याचा प्रवाह थांबण्यास मदत झाली, आजही ही प्रणाली जगभर वापरली जात आहे.

1909 मध्ये त्यांची म्हैसूर राज्याचे मुख्य अभियंता म्हणून नियुक्ती झाली. म्हैसूर राज्यातील निरक्षरता, गरिबी, बेरोजगारी, रोगराई इत्यादी मूलभूत समस्यांबद्दलही त्यांना काळजी होती. या समस्यांना तोंड देण्यासाठी त्यांनी 'इकॉनॉमिक कॉन्फरन्स' स्थापन करण्याची सूचना केली. यानंतर त्यांनी म्हैसूरमध्ये कृष्णा राजसागर धरण बांधले. त्यांनी पाण्यासह स्वयंचलित फ्लडगेट डिझाइन आणि पेटंट केले, जे पुण्याच्या खडकवासला जलाशयात 1903 मध्ये पहिल्यांदा वापरले गेले आहे. त्यांना त्यांच्या या योगदानाबद्दल अनेक पुरस्कार मिळाले  मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचे वयाच्या 102 व्या वर्षी 14 एप्रिल 1962 रोजी बेंगळुरू येथे निधन झाले.

अश्या या महान अभियंत्याच्या स्मरणार्थ भारत सरकारने 1968 मध्ये डॉ. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जन्मतारखेला 'अभियंता दिन' म्हणून घोषित केले. तेव्हापासून दरवर्षी 15 सप्टेंबर रोजी अभियंता दिन साजरा केला जातो.  

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने