Navratri Culture: महाराष्ट्रातील साडेतीन शक्ती पीठातील एक पूर्ण पीठ श्री क्षेत्र तुळजापुर.

 


तुळजापूर हे तीर्थक्षेत्र हे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या सीमेवर आलेल्या उस्मानाबाद जिल्हात आहे. तुळजापूर गावात तुळजा भवानी मातेचे हेमाडपंती शैलीचे पुरातन मंदिर आहे. महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी श्री तुळजाभवानी देवीचे तुळजापूर क्षेत्र हे एक पूर्ण शक्तिपीठ आहे. ही देवी भगवती (भवानी) म्हणून प्रसिद्ध आहे. महाराष्ट्र क्षात्रतेजाची स्फूर्ती देवता, प्रेरणाशक्ती व स्वराज्य संस्थापक राजे श्री शिवछत्रपती यांची आराध्यदेवता, अशी ही तुळजापूरची भवानीदेवी महाराष्ट्राची कुलस्वामीनी आहे. हे गाव बालाघाटच्या एका कड्यावर वसले आहे. मंदिराच्या काही भागाची धाटणी हेमाडपंती आहे. इतिहास व पुरातत्त्वदृष्ट्या हे मंदिर राष्ट्रकुट अथवा यादवकालीन मानले जाते. तर काहींच्या मते हे १७ व्या किंवा १८ व्या शतकातील मंदिर आहे.

स्कंद पुराणातील सह्याद्री खंडात श्री तुळजाभवानीची अवतार कथा आहे. कृतयुगात कर्दम ऋषीपत्नी अनुभूती तपस्येत असताना, कूकर या दैत्याने तिचे पावित्र्य भंग करण्याचा प्रयत्न केला. तपस्वी अनुभूतीने पावित्र्य रक्षणासाठी देवी भगवतीचा धावा केला. देवी भगवती साक्षात प्रगटली व कूकर या दैत्याशी युद्ध करून त्याचा वध केला. साध्वी अनुभूतीच्या विनवणीवरून देवी भगवतीने या पर्वतराईत वास्तव्य केले. भक्ताच्या हाकेला त्वरित धावून येणारी व मनोरथ पूर्ण करणारी म्हणून ही देवी त्वरिता-तुरजा-तुळजा (भवानी) या नावाने ओळखली जाते.

येथील मंदिराच्या दक्षिणेकडील दरवाजास ‘परमार’ दरवाजा म्हणतात. जगदेव परमार या महान देवीभक्ताने आपले मस्तक सात वेळा देवीला अर्पण केले, अशी श्लोकरचना या दरवाजावर कोरली आहे. सभामंडपात पश्र्चिम दिशेला गर्भगृह असून चांदीच्या सिंहासनात, पूर्वाभिमुख अशी श्री तुळजाभवानी देवीची रेखीव व प्रसन्न मूर्ती आहे. मूर्ती गंडकी शिळेची असून प्रमाणबद्ध आहे. अष्टभुजा महिषासुरमर्दिनी असे देवीचे मनोहर रूप आहे. देवी भवानीची ही स्थलांतर करता येणारी मूर्ती आहे. वर्षातून तीनवेळा ही मूर्ती मंचकी (पलंगावर) विसावते. असे इतरत्र कोठेही आढळत नाही. गर्भगृहाच्या भिंतीवर छोटी-छोटी आकर्षक शिल्पे आहेत. सभामंडपात उत्तरेस देवीचे शयनगृह असून इथे चांदीचा पलंग आहे.

देवी मंदिराच्या मागच्या बाजूस काळा दगडाचा चिंतामणी असून तो गोल आकाराचा आहे. आपले काम होईल की नाही याचा कौल हा चिंतामणी देतो अशी भाविकांची श्रद्धा आहे. शिवाजी महाराजही युद्धाला जाण्यापूर्वी मातेचे दर्शन घेऊन चिंतामणीकडे कौल मागत असत. एक रुपयाचे नाणे ठेवून चिंतामणी उजवीकडे फिरल्यास काम होणार व डावीकडे फिरल्यास काम होणार नाही असे समजले जाते. चिंतामणीच्या बाजूलाच देवीच्या अलंकाराचा खजिना, देवीची वाहन ठेवण्याची जागा आणि गुप्तदान कुंडी आहे. देवीच्या अलंकारामध्ये अस्सल सोन्याच्या माळा, हिर्‍या मोत्यांचे दागिने, जुडवा, कंबरपट्टा, सूर्यहार, चंद्रहार, रत्नहार, चिंचपेटा व रत्नजडित खडावा आहेत. 

छत्रपती शिवाजी महाराजांनी देवीस सोन्याची माळ अर्पण केली आहे. या माळेच्या प्रत्येक पुतळीवर राजे शिवछत्रपती अशी अक्षरे कोरली आहेत. नवरात्रोत्सवात मुख्य सणांच्या दिवशी, पाडवा, दसरा, दिपावली आदी प्रसंगी देवीस संपूर्ण अलंकार घातले जातात. मुख्य मंदिरासोबतच गोमुख तीर्थ, श्रीकल्लोळ तीर्थ, मंकावती तीर्थ, पापनाशी तीर्थ भक्तांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरतात. याशिवाय महंत भारतीबुवांचा मठ, महंत बाकोजीबुवांचा मठ, हमरोजी बुवा मठ, अरण्य गोवर्धन मठ संस्थान, महंत गरीबनाथ मठ तुळजापुरात आहेत.

हजारो वर्षाचा इतिहास असलेल्या भवानीमातेला कधी त्वरिता, तर कधी त्वरचा तर कधी  तुरजा, तुकाई या नावाने भक्त गण संबोधतात. छत्रपती शिवाजी राजांचे जीवन चरित्र  वाचल्यावर आपल्याला असे लक्षात येईल की,छत्रपती शिवाजी महाराज यांची भवानी मातेवर खूप श्रद्धा होती. म्हणून शिवाजी महाराजांच्या झंझावाती जीवन प्रवासात भवानीमातेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. म्हणूनच महाराजांच्या संघर्षमय कठीण प्रसंगात  भवानी मातेवरील श्रद्धने दिशा देण्याचे काम केले आहे. याबद्दल अनेक कथा महाराष्ट्रात सांगितल्या जातात. शिवाजी महाराजांच्या स्वराज्य मोहिमेत विरोधक असलेले जावळीचे मोरे यांचा पाडाव केल्यानंतर महाराजांनी प्रतापगडावर भवानी देवीची स्थापना केली तसेच अफझल खानाचा वध केल्यानंतर भवानी मातेचे मंदिरही बांधले. 

शारदीय नवरात्रात  तुळजापुरला नऊ दिवस भरगच्च यात्रा भरते. नवरात्रात स्थापनेपासून देवीची महापूजा मोठ्या धुमधडाक्यात करण्यात येते. तसेच तुळजापूरमध्ये मकर संक्रांत, बाल प्रतिपदा, गुढी पाडवा अशा साडेतीन मुहूर्ता प्रसंगी सुद्धा देवीची महापूजा भक्तगण आयोजित करीत असतात. तुळजापूरची तुळजाभवानी देवी ही नवसाला पावणारी व संकट काळी त्वरित धावून येत असल्याचे भाविकांचे म्हणणे आहे. म्हणून लाखो भाविक,भक्तगण देवीच्या दर्शनाला आणि नवस करण्यासाठी तुळजापुरात दाखल होतात.  याशिवाय देशभरातून भक्तमंडळी, पर्यटक, विद्यार्थी अभ्यासक येथे नेहमी येत असतात. गोंधळ संबळ तुणतुने यांच्या साह्याने भवानी मातेचा गोंधळ घालून देवीची आराधना करण्याची येथे पद्धत आहे. पोतराज आराधी घेऊन देवीच्या नावाचा गजर करतो आणि पूर्वजांचे नावे घेऊन देवीचा नवस फेडतो. शाकंभरी नवरात्र उत्सव, अश्विनी पोर्णिमा, चैत्री पोर्णिमा या दिवशी उत्सव साजरा करण्यात येतो. 

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने