Navratri Celebration: नवरात्रातील नऊ रंगाचे महत्व, येत्या नवरात्रात कोणत्या दिवशी कोणता रंग वापरणार.

 



पितृपक्ष पंधरवडा संपत आला कि सर्वाना वेड लागतात ते आदिशक्तीच्या उत्सवाचे म्हणजेच शारदीय नवरात्रीचे  हळूहळू नवरात्री मंडळे देवीच्या उत्सवासाठी सज्ज झालेली दिसतील. या वर्षी २६-१०-२०२२ रोजी घटस्थापना होते असुन  त्यानंतर देवीच्या उत्सवाला खऱ्या अर्थाने रंग चढनार आहे. रंग म्हणजे उत्साहाचे, मांगल्याचे, तेजाचे, सात्विकतेचे, समृद्धीचे, सौंदर्याचे, विजयाचे, तसेच स्वाभिमानाचे प्रतीक. ह्या विविध  रंगानी सुद्धा आता नवरात्रीची एक वेगळी ओळख बनवली आहे. आता तर नऊ दिवस नऊ वेगवेगळ्या रंगांचे कपडे परिधान करण्याची स्त्रीवर्गामध्ये उत्सुकता असते. नवरंगाची उधळण ही संकल्पना देखील आता चांगलीच लोकप्रिय होत आहे. निसर्ग हा अनेक रंगांनी सजलेला असून नवरात्र पूजा ही निसर्ग शक्तीची, आदिशक्तीची व मातृशक्तीची म्हणजेच सृजन शक्तीची पूजा असते. 

नवरात्रात एकाच दिवशी सर्व जणांनी एकाच रंगाचे कपडे परिधान केले तर महिलांमध्ये एकजुटीची भावना जोपासली जाते. तसेच मनात उत्साह, आनंद व सुरक्षिततेची भावना निर्माण होते. स्वाभिमान व आत्मविश्वास जागृत होतो. एकाच रंगाचे कपडे घातलेला उत्साही जमाव पाहून मनात एकोपा निर्माण होतो. एका अर्थाने नवरात्राचे नऊ दिवसांचे नऊ रंग हे नवलाई समानतेच्या, अन एकोप्याच्या भावना निर्माण करतात या काळात स्त्री शक्तीचे दर्शन घडते. हाच प्राथमिक  उद्देश नवरात्रातील नवरंगांमध्ये आहे. चला तर जाणुन घेऊ या नऊ रंगांमधील प्रत्येक रंगाचे  विशिष्ट महत्त्व काय आहे व कोणत्या दिवशी कोणता रंग वापरायचा आहे 

पहिली माळ (सोमवार) 26/09/2022 रंग पांढरा :  या रंगाला प्रथम पसंती देणाऱ्या व्यक्तींच्या स्वभावात सकारात्मक दृष्टीकोन दिसून येतो. स्वभावात मोकळेपणा, इतरांना समजून घेण्याची वृत्ती असते. अशा व्यक्ती स्वत:ला जास्त जपतात. पांढरा रंग मांगल्य, स्वच्छ, पवित्र स्वभावाचा निदर्शक समजला जातो. 

दूसरी माळ (मंगळवार ) 27/09/2022 रंग लाल : इच्छाशक्तीच्या सार्मथ्याचा, वस्तुनिष्ठतेचा, कार्यरत असण्याचा, चपळपणाचा, उद्योगशीलतेचा, गतिमानतेचा म्हणूनही लाल रंगाला विशेष महत्त्व आहे. शौर्याचे, संघर्षाचे प्रतिक असलेल्या लाल रंगात एक प्रकारची ऊब आहे. सदैव कार्यरत असण्याचे लक्षण असलेला हा रंग दुर्गा मातेशी संलग्न आहे.

तीसरी माळ (बुधवार ) 28/09/2022 रंग निळा : शांती निदर्शक असा हा निळा रंग. शीतल आणि स्निग्धता ही या रंगाची वैशिष्ट्य आहेत. हा रंग ज्यांना प्रिय असतो ती माणसं स्वभावाने उदार, विश्वासू, श्रद्धाळू, सौंदर्यप्रेमी आणि सुखी जीवन व्यतीत करणारी असतात. या रंगाच्या मानसिक परिणामामुळे शांती, मानसिक आरोग्य आणि स्थिरता सुधारण्यास मदत होते.

चौथी माळ (गुरूवार) 29/09/2022 रंग पिवळा : मन प्रसन्न आणि संतुलित करण्यासाठी पिवळा रंग मदत करतो, एखाद्या गोष्टीसाठी  प्रतीक्षा करण्याची संयमीवृत्ती ह्या रंगाने लाभते. हा रंग आशादायी आणि मनाला नवी उभारी देतो. तसेच संपन्न व्यक्तिमत्व, अध्यात्मात आवड, प्रगतीचा ओढा असे  गुण दर्शवितो. आपल्याकडे धार्मिक समारंभामध्ये पिवळ्या रंगाचे महत्त्व अनन्यसाधारण असं आहे. 

पाचवी माळ (शुक्रंवार) 30/09/2022 रंग हिरवा : हिरवा रंग स्वाभिमानाचा, सृजनशक्तीचा, सौभाग्याचा, धारणाशक्तीचा, प्रकृतीचा, निसर्गाचा निदर्शक आहे. सौभाग्याशी हिरव्या रंगाचं अतूट असं नातं आहे. निसर्गाचा रंग ही हिरवाच, निसर्गदेवता आई जगदंबेशी संलग्न असणारा असा हा हिरवा रंग. हिरवा रंग शांत आणि डोळ्यांना अल्हाददायक आहे. यामुळे ताण कमी होण्यास तसेच मनाची शांतता वाढण्यास मदत होते.

सहावी माळ (शनिवार) 01/10/2022 रंग करडा/राखाडी/ग्रे: काळा आणि पांढरा या मधला हा रंग आहे, हा रंग गौरव आणि प्रतिष्ठा वाढवण्यास मदत करतो. स्थिरतेचा, सुरक्षतेचा, कौशल्याचा, शिस्तबद्ध्तेचा हा करडा रंग!

सातवी माळ (रविवार) 02/10/2022  रंग भगवा/केशरी : केशरी रंग हा शौर्याचे, विजयाचे, प्रगतीचे  प्रतिक आहे. हा रंग परिधान केल्यास तुमच्या व्यक्तिमत्वात एक आकर्षक तेजोवलय निर्माण होतं. तेज, प्रसिद्धी, यशाचा हा रंग आहे. हा रंग आपल्याकडे अनेक स्तरांवर मुबलकता घेऊन येतो.

आठवी माळ (सोमवार ) 03/10/2022 रंग गुलाबी : महिलांना विशेष भावणारा हा गुलाबी रंग सृजनतेचं, भावनांचं, सर्जनशीलतेचं, प्रेमाचं, जिव्हाळ्याचं प्रतिक आहे. अतिशय लोकप्रिय असणारा हा रंग सौंदर्य आणि निष्पापतेचे प्रतिक आहे. अतिशय सौम्य प्रवृत्तीचा हा रंग अस्सल प्रेम व्यक्त करण्यास मदत करतो. तर गुलाबी अधिक नितळपणे भावना व्यक्त करण्यास मदत करते.

नववी माळ ( मंगळवार ) 04/10/2022 रंग जांभळा : जांभळा रंग हा निळा आणि लाल रंगाचे मिश्रण आहे. म्हणून हा रंग निळ्या रंगाप्रमाणे नवकल्पनेचे आणि लाल रंगाप्रमाणे नवचैतन्याचे प्रतीक आहे. हिंदू धर्मात ह्या रंगाला खुप महत्व आहे. जांभळा रंग मनाची स्थिरता सुधारण्यास तसेच भीतीवर मात करण्यास मदत होते. राजेशाही थाट असणारा हा रंग गर्दीत उठून दिसण्यास मदत करतो.



0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने