Panjab MMS: एसआयटी तपास करणार, विद्यापीठ 6 दिवसांसाठी बंद, जाणून घ्या संपुर्ण प्रकरण

 



पंजाबमधील मोहाली (Chandigarh mohali MMS case) येथील खासगी विद्यापीठात विद्यार्थिनींचा व्हिडिओ लीक झाल्याप्रकरणी खळबळ उडाली आहे. हजारो विद्यार्थिनी विद्यापीठासमोर आंदोलन करत आहेत. वसतिगृहात राहणाऱ्या 60 विद्यार्थिनींचा अंघोळ करतानाचा व्हिडिओ लीक केल्याचा आरोप विद्यापीठातील एका विद्यार्थ्यावर आहे. व्हिडिओ लीक प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत आरोपी विद्यार्थ्यासह तिघांना अटक केली आहे. यात व्हिडीओ बनवणारी हॉस्टेलची मुलगी आणि शिमल्यात राहणारा तिचा मित्र सामील असल्याचं सांगण्यात येत आहे. असे असतानाही शनिवार नंतर रविवारी रात्री उशिरापर्यंत विद्यार्थ्यांनी विद्यापीठाबाहेर आंदोलन केले. पंजाब पोलिसांचे डीजी जीएस भुल्लर यांनी स्वतः आंदोलक विद्यार्थ्यांशी बोलून प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला. जाणून घ्या काय आहे हे संपूर्ण प्रकरण.

वसतिगृहात राहणाऱ्या एका विद्यार्थिनीने 60 हून अधिक विद्यार्थिनींचा अंघोळ करतानाचा व्हिडिओ बनवला होता आणि तो तिच्या मित्राला पाठवला त्यानंतर तो व्हिडिओ व्हायरल झाला. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर 8 विद्यार्थिनींनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याचीही बातमी समोर आली. यानंतर विद्यापीठातील विद्यार्थी संतप्त झाले आणि त्यांनी शनिवारी रात्री विद्यापीठाचे गेट गाठून जोरदार निदर्शने केली.निदर्शने करणाऱ्या विद्यार्थ्यांनी  विद्यापीठ प्रशासन हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला. वाढता वाद पाहता विद्यापीठ प्रशासनाने आरोपी विद्यार्थिनीला वसतिगृहाच्या खोलीत बंद करून चौकशी केली. चौकशीत तरुणीने आपला गुन्हा कबूल केला असुन. आरोपी विद्यार्थिनीने सांगितले की तिने व्हिडिओ शिमल्यात राहणाऱ्या मित्राला पाठवला होता.

यानंतर पोलिसांनी आरोपी विद्यार्थ्याला आधीच अटक केली. तसेच व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या आरोपी तरुणालाही अटक करण्यात आली आहे. आरोपी तरुणाला शिमल्यातील रोहरू येथून पकडण्यात आले असून आरोपी तरुणाकडून चार मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. आरोपीला पंजाब पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. याशिवाय आरोपी तरुणाच्या एका साथीदारालाही देखील पोलिसांनी अटक केली आहे. मोहालीचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक विवेक शील सोनी यांनी सांगितले की, अनेक विद्यार्थिनींचे व्हिडिओ लीक झाल्याच्या अफवांनंतर मध्यरात्रीनंतर विद्यापीठात आंदोलन करण्यात आले. ते म्हणाले की, अटक करण्यात आलेल्या विद्यार्थ्याचा मोबाईल फोन फॉरेन्सिक तपासणीसाठी जप्त करण्यात आला आहे. त्याचवेळी विद्यार्थ्यानीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे वृत्त पोलिसांनी फेटाळून लावले आहे.

पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय दंड संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 354 सी अंतर्गत आरोपी विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल करून तपास सुरू आहे. या घटनेच्या चौकशीचे आदेश देत मुख्यमंत्री भगवंत मान म्हणाले की, दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. पोलीस आणि विद्यापीठ प्रशासनाने आंदोलक विद्यार्थ्यांना आश्वासित केले आणि योग्य कारवाईचे आश्वासन दिले. या प्रकरणी पोलीस विभागाने वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली एसआयटी स्थापन केली आहे. तसेच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि राज्यसभा खासदार राघव चढ्ढा यांनी याबाबत योग्यती कारवाईचे आश्वासन दिले आहे. केजरीवाल म्हणाले की, ही बाब अत्यंत गंभीर आणि लज्जास्पद आहे. त्यांनी पीडित मुलींना धैर्याने वागण्यास सांगितले. तसेच राज्यसभा खासदार राघव चढ्ढा याने आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, पंजाब सरकारने दोषींवर कठोर कारवाई करावी.

मोहाली एमएमएस स्कँडलबाबत वाढता वाद पाहता सुरवातीला दोन दिवस कॉलेजला सुट्टी जाहीर करण्यात आली होती. मात्र नंतर ती वाढवून 6 दिवस करण्यात आली आहे. त्यासाठी पत्रही देण्यात आले. पत्रानुसार आता 6 दिवस अध्यापनाचे कामकाज पूर्णपणे बंद राहणार आहे. विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थ्यांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान एमएमएस प्रकरणानंतर विद्यार्थिनी आधीच घाबरल्या आहेत. परंतु, मुलींना परदेशातून फोन येत असल्याच्या बातम्या येत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हिडिओ ऑनलाइन व्हायरल करण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. मात्र, अद्याप याला कोणीही दुजोरा दिलेला नाही.अशी माहिती एका वृत्त संस्थेने दिली आहे.  

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने