श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था (शिर्डी) च्या वतीने आयोजित केलेल्या 104 वा श्री पुण्यतिथी उत्सवाची तयारी पुर्ण झाली असून मुंबई येथील व्दारकामाई मंडळाच्या वतीने आकर्षक विद्युत रोषणाई व सर्व धर्म समभाव आणि स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव यावर आधारित “श्री साई दरबार” हा भव्य देखावा प्रवेशव्दारावर उभारण्यात आला आहे. तसेच उत्सवकाळात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी दिली.
श्रीमती बानायत म्हणाल्या, जगभरात श्री साईबाबांचे लाखो साईभक्त आहेत. हे साईभक्त श्री पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त आपल्या सदगुरुंचा आशिर्वाद ग्रहण करण्याकरीता शिर्डीला येतात. त्यामुळे श्रींच्या समाधीच्या दर्शनाकरीता साईभक्तांची होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेवून मंदिर परिसरासह चावडी समोर, मारुती मंदिर ते शामसुंदर हॉल, समाधी मंदिराच्या दक्षिण बाजुकडील पालखी मार्ग, साई उद्यान परिसर, जुना पिंपळवाडी रोड दर्शनरांग व नविन श्री साईप्रसादालय परिसर आदि ठिकाणी 52 हजार चौरस फुटाचे मंडप उभारण्यात आलेले आहे. तसेच अतिरिक्त निवासव्यवस्थेसाठी भक्तनिवासस्थान (500 रुम) येथे 4500 चौरस फुटाचा मंडप उभारण्यात आला आहे.
हा उत्सव यशस्वरित्या पार पाडण्यासाठी संस्थानचे तदर्थ समितीचे अध्यक्ष तथा प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधिश सुधाकर यार्लगड्डा, सदस्य तथा जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले व मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थानचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल जाधव, सर्व प्रशासकीय अधिकारी, संरक्षण अधिकारी, सर्व विभाग प्रमुख व कर्मचारी प्रयत्नशिल आहे.
टिप्पणी पोस्ट करा