सध्या सुरु असलेल्या सणासुदीच्या काळात, रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी आणि प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी, भारतीय रेल्वेने यावर्षी छठ पूजेपर्यंत 179 विशेष गाड्यांच्या (जोड्यांमध्ये) 2269 फेऱ्या चालवण्याचे नियोजन केले आहे. रेल्वे मार्गावरील दिल्ली-पटना, दिल्ली-भागलपूर, दिल्ली-मुझफ्फराबाद, दिल्ली-सहरसा यासारख्या देशभरातील प्रमुख स्थानकांना जोडण्यासाठी या विशेष रेल्वे गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. गाड्यांच्या अनारक्षित डब्यांमध्ये प्रवाशांचा प्रवेश व्यवस्थित व्हावा यासाठी आरपीएफ अर्थात रेल्वे पोलीस दलाच्या देखरेखीखाली रेल्वेच्या अंतीम स्थानकांवर (टर्मिनस) रांगा लावून गर्दीचे व्यवस्थापन केले जात आहे.
प्रवाशांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी प्रमुख स्थानकांवर आरपीएफ चे अतिरिक्त जवान तैनात करण्यात आले आहेत. गाड्या सुरळीत चालाव्यात यासाठी प्रमुख स्थानकांवर आपत्कालीन सेवेसाठी अधिकारी तैनात करण्यात आले आहेत. रेल्वे सेवेतील कोणताही व्यत्यय प्राधान्याने हाताळण्यासाठी विविध विभागांमध्ये कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. फलाट क्रमांकासह गाड्यांच्या आगमन/प्रस्थानाची वारंवार आणि वेळेवर घोषणा करण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
प्रवाशांना सहाय्य आणि मार्गदर्शन करण्यासाठी महत्त्वाच्या स्थानकांवर "आपल्याला मदत हवी आहे का" बूथ कार्यरत ठेवले गेले आहेत. या ठिकाणी आरपीएफ कर्मचारी आणि टीटीई यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महत्वाच्या स्थानकांवर चोवीस तास आरोग्य पथके उपलब्ध आहेत. सह-वैद्यकीय (पॅरामेडिकल) पथकासह रुग्णवाहिका देखील उपलब्ध आहे.
आसने राखून ठेवणे, अतिरिक्त शुल्क घेणे आणि दलाली यासारख्या सुरक्षा आणि दक्षता विभागाच्या कर्मचार्यांकडून केल्या जाणाऱ्या गैरप्रकारांवर लक्ष ठेवले जात आहे आणि त्याचे कठोर निरीक्षण केले जात आहे. स्थानकांवर एकूण स्वच्छता, विशेषतः प्रतीक्षा दालने, आरामाच्या खोल्या, रेल्वे फलाट या ठिकाणी स्वच्छता राखण्याबाबतच्या सूचना विभागीय मुख्यालयांनी दिल्या आहेत.
टिप्पणी पोस्ट करा