भारताने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून मालिका 2-1 ने जिंकली.

 


3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून मालिका 2-1 ने जिंकली. आज झालेल्या सामन्यात भारताने एकतर्फी विजय मिळवत दक्षिण आफ्रिकेच्या मालिका जिंकण्याच्या आशा धुळीस मिळवल्या. यापूर्वी भारताने दक्षिण आफ्रिके विरुद्ध  3 सामन्यांची T20I मालिका  देखील 2-1 अशी जिंकली होती.

आज दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या तिसऱ्या सामन्यात शिखर धवनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. परंतु दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज भारतीय गोलंदाजीपुढे टिकू शकले नाहीत आणि त्यांचा संपूर्ण संघ 27.1 षटकांत 99 धावांत गारद झाला. कुलदीप यादवने अप्रतिम गोलंदाजी करत 4.1 षटकात 18 धावा देत 4 बळी घेतले. यासाठी त्याला सामनावीर म्हणूनही गौरविण्यात आले. तर वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज आणि शाहबाज अहमद यांनी प्रत्येकी २ बळी घेतले.

100 धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाने 19.1 षटकांत 3 गडी गमावून 105 धावा केल्या आणि विजय मिळवला. भारताकडून शुभमन गिलने 49 धावा केल्या. श्रेयस अय्यरने 19 व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर षटकार ठोकत संघाला विजय मिळवून दिला.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने