जपानी वैज्ञानिकांचे 300 वर्षापूर्वी सापडलेल्या जलपरीच्या (Mermaid) मृतदेहावर संशोधन सुरु

 


जलपरी हिच्या अस्तित्वा बद्दल बऱ्याच जणांनी  ऐकले असेल, जगामध्ये जलपरी हिच्या अस्तित्वचे  पुरावे मिळत असल्याचा दावा बऱ्ऱ्याच वेळा केला जातो, पण त्यांचे अस्तित्व खरचं आहे का, याबाबत अनेकांच्या मनात शंका आहे. त्यांच्याबद्दल निश्चितपणे कोणी काही सांगू शकत नाही. जलपरी (Mermaid) पाहिल्याची, तिचे अस्तित्व असल्याचे सांगणारा अंश मिळाल्याच्या अनेक गोष्टी आजपर्यंत तुम्ही ऐकल्या, वाचल्या असतील. पण प्रत्येक गोष्ट शेवटी संशयाच्या भोवऱ्यात येते, आणि लोक त्याकडे भ्रम म्हणून दुर्लक्ष करतात. पण तुम्हाला माहिती आहे का, जपानमधील शिकोकू बेटावर सुमारे 280 वर्षांपूर्वी एका मच्छिमाराच्या जाळ्यात एका जलपरीचा  (280 Year Old Mermaid Body) मृतदेह अडकला होता. या मृतदेहाचे गूढ अद्यापही उकललेलं नाही.

1736 ते 1741 च्या दरम्यान एका मच्छिमाराला जलपरीचा हा मृतदेह सापडला होता, असे सांगितले जाते. हा मृतदेह आता जपानमधील आस्कुची येथील एका मंदिरात ठेवण्यात आलाय. या विचित्र प्राण्याला जलपरी म्हटले जाते. कारण त्याचा चेहरा माणसासारखा आहे, पण त्याला शेपटी आहे. जपानमध्ये असा एक समज आहे जो जलपरीचे मांस खातो तो अमर होतो. आता या शेकडो वर्षे जुन्या जलपरीचा मृतदेह तपासणीसाठी तज्ज्ञ घेऊन गेले आहेत. या तपासणी नंतर  अनेक गुपिते उकलण्याची शक्यता आहे.

मच्छिमाराला सापडलेला हा मृतदेह अतिशय विचित्र अवस्थेत होता. मृतदेहाचे हात चेहरा झाकण्याचा प्रयत्न करत असल्याच्या अवस्थेत आहेत. यासोबतच डोक्यावरील केस, जबड्यातील तीक्ष्ण दात स्पष्टपणे दिसतात. कुराशिकी विज्ञान आणि कला विद्यापीठातील ( Kurashiki University of Science and the Arts ) संशोधकांनी या मृतदेहाचे रहस्य समोर यावे, याचा शोध घेण्यासाठी तो सोबत नेलाय. या संशोधन प्रकल्पाचे संचालक, ओकायामा फोकलोर सोसायटीचे (Okayama Folklore Society) हिरोशी किनोशिता (Hiroshi Kinoshita) यांच्या मते याला धार्मिक महत्त्व असू शकते. जपानी पौराणिक कथेनुसार, जर कोणी जलपरींचे मांस खाल्ले तर तो अमर होतो. त्यामुळे जेव्हा हा मृतदेह सापडला, तेव्हा अनेकांनी त्याचे मांस खाल्ल्याचे मानले जाते.

जपानमध्ये एका महिलेची कथा खूप लोकप्रिय आहे. या महिलेने चुकून जलपरीचे मांस खाल्ले होते. यानंतर ती पुढील 800 वर्षे जगली. तसेच काही लोकांच्या मते, एखाद्या व्हायरसमुळे झालेल्या आजाराने या व्यक्तीची अशी अवस्था झाली असेल. मात्र, या मृतदेहावर संशोधकांचा अभ्यास पूर्ण झाल्यानंतरच त्यामध्ये कुठल्या आजाराच्या खुणा आहेत की नाही, हे समोर येईल. जपानच्या मंदिरात आतापर्यंत अनेकांनी येऊन हा मृतदेह पाहिला आहे. आता इतक्या वर्षांनंतर तज्ज्ञ त्याचे गूढ उकलण्याचा प्रयत्न करीत आहेत. आता जपानमधील जलपरीचा मृतदेह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेकडो वर्षाच्या मृतदेहाचे गूढ उकलण्यात शास्त्रज्ञांना यश येणार का, हे पाहावे लागेल.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने