गँबियामध्ये 66 मुलांच्या मृत्यूनंतर, राज्य FDA ने मेडेन फार्माला बजावली नोटीस

 


जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) चेतावणी दिल्यानंतर भारतीय औषध कंपनी मेडेन फार्मास्युटिकल्स लिमिटेड कंपनीची अधिक चौकशी सुरू आहे. दरम्यान, कफ सिरप बनवणाऱ्या मेडेन फार्मास्युटिकल्स या औषध कंपनीबाबत आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. हरियाणा राज्य औषध नियंत्रकाने मेडेन फार्मास्युटिकल्सच्या कच्च्या मालाच्या गुणवत्ता चाचणी मानदंडांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. यासोबतच कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावून कंपनीचा परवाना का रद्द करू नये, अशी विचारणा केली आहे. गँबियामध्ये 66 मुलांच्या मृत्यूनंतर मेडेन फार्मास्युटिकल्स ही फार्मा कंपनी स्कॅनरच्या कक्षेत आली आहे.

हरियाणा राज्य औषध नियंत्रण अधिकाऱ्यांनी मेडेन फार्मा कंपनीतील 12 उल्लंघनांची यादी तयार केली आहे. राज्य औषध नियंत्रकाने 7 ऑक्टोबर रोजी कंपनीला बजावलेल्या कारणे दाखवा नोटीसमध्ये कंपनीने वादग्रस्त कफ सिरपच्या निर्मितीमध्ये वापरल्या जाणार्‍या कच्च्या मालाची गुणवत्ता चाचणी केली नसल्याचा आरोप केला आहे. एका इंग्रजी वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, नोटीसनुसार, मेडेन फार्मा कंपनीला 14 ऑक्टोबरपर्यंत उत्तर द्यावे लागणार आहे.

औषध तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या कच्च्या मालाची गुणवत्ता चाचणी कंपनीमध्ये करण्यात आली नसल्याचे नोटिसीत म्हटले आहे. तज्ज्ञांच्या मते, प्रोपीलीन ग्लायकोल ज्याचा वापर औषधे तयार करण्यासाठी केला जातो. त्यात डायथिलीन ग्लायकॉल आणि इथिलीन ग्लायकोल दूषित घटक असू शकतात. या विषारी रसायनांना WHO ने मृत्यूचे संभाव्य कारण म्हणून नियुक्त केले आहे. यासोबतच औषध निर्मितीसाठी कडक गुणवत्ता नियंत्रण ठेवण्यास सांगितले आहे.

राज्य FDA ने मेडेन फार्माला कारणे दाखवा नोटीस बजावून सात दिवसांत उत्तर देण्यास सांगितले आहे. यासोबतच कंपनीचा मॅन्युफॅक्चरिंग लायसन्स का रद्द करू नये, अशी विचारणा कंपनीला करण्यात आली आहे. जर कंपनीने एका आठवड्यात प्रतिसाद दिला नाही तर कंपनीवर ड्रग्ज अँड कॉस्मेटिक्स अॅक्ट, 1940 आणि नियम 1945 नुसार एकतर्फी कारवाई करण्यात येईल असे देखील नमूद करण्यात आले आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने