मुंबईत आयात सामानात सापडलेले विदेशी प्रजातीचे 665 प्राणी ताब्यात, दोघांना अटक.

 


महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (DRI) मुंबई प्रदेश कार्यालयातील अधिकाऱ्यांनी एअर कार्गो संकुलातील आयात सामानामध्ये सापडलेले विदेशी प्रजातीचे 665 प्राणी ताब्यात घेतले. दुर्मिळ आणि विदेशी वन्यजीवांच्या प्रजातींच्या मोठ्या संख्येने जप्तींच्या कारवाईपैकी ही एक कारवाई आहे अशी माहिती डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी दिली.

हाती आलेल्या गुप्त माहितीवरून डीआरआयच्या मुंबई प्रदेश कार्यालयातील अधिकाऱ्यांनी एअर कार्गो संकुलात आलेले आयात सामान 6 ऑक्टोबर रोजी ताब्यात घेतले. या सामानाची बारकाईने तपासणी केल्यानंतर वन विभाग आणि वन्यजीवविषयक गुन्हे नियंत्रण ब्युरोच्या अधिकाऱ्यांना त्यात मासळीच्या खोक्यांमध्ये लपवलेले अजगर, पाली, कासवे तसेच घोरपड इत्यादींच्या परदेशी प्रजातींचे प्राणी मोठ्या संख्येने आढळून आले. ज्या व्यक्तीने या प्राण्यांची आयात केली तसेच जी व्यक्ती या प्राण्यांना इच्छित स्थळी पोहोचविणार होती त्या दोघांनाही अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरु आहे अशी माहिती डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

लुप्त होण्याचा धोका असलेल्या वन्य प्राणी आणि वनस्पती यांच्या व्यापारासंदर्भातील कराराच्या परिशिष्टात सूचीबद्ध केलेले अशा प्रजातींचे प्राणी आयात करण्यावर कायद्याने बंदी आहे. या प्राण्यांची तस्करी करण्यात आल्याचे निदर्शनास आल्याने, हे प्राणी ताब्यात घेण्यात आले. सीमाशुल्क कायदा तसेच परदेशी व्यापार विकास (नियंत्रण) कायदा यांतील तरतुदींच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. अशी माहिती अर्थ मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात दिली आहे 

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने