कार्तिक शुद्ध प्रतिपदा अर्थात दिवाळी पाडवा. श्रीविष्णूने ही तिथी बलीराजाच्या नावाने केली, म्हणून या तिथीला ‘बलीप्रतिपदा’ (BaliPratipada) असेही म्हटले जाते.अत्यंत दानशूर, परंतु दान कोणाला द्यावे याची जाण नसलेल्या बलीराजाला भगवान श्रीविष्णूने वामनावतार येऊन पाताळात धाडल्याचा हा दिवस आहे. तीन पावले भूमी दान मागून वामनाने बलीराजाला जरी पाताळात धाडले असले, तरी सर्वार्थाने त्याचे कल्याणच केले आहे. पृथ्वीतलावर दीपावली साजरी केली जाण्यामागेदेखील हि घटना देखील प्रमुख आधार आहे.
यावर्षी हा दिवस २६ ऑक्टोबर २०२२ रोजी येत असून या तिथीचे आध्यात्मिक महत्त्व आहे. बलीप्रतिपदा तिथी साडेतीन मुहुर्तांमध्ये समाविष्ट आहे अक्षय्य तृतीया, गुढीपाडवा, विजयादशमी (दसरा) हे पूर्ण मुहूर्त असून दिवाळी पाडवा हा अर्धा मुहूर्त आहे. साडेतीन मुहुर्तांना ईश्वराची पराशक्ती ब्रह्मांडात प्रक्षेपित होत असते. या शक्तीच्या प्रभावामुळे ब्रह्मांडातील सत्त्वगुणाला चालना मिळून सर्वत्र मंगलकारी लहरींचे प्रक्षेपण होऊन सद्गुणांना चालना मिळते. त्यामुळे साडेतीन मुहूर्तांच्या वेळी अनेक शुभकर्मे केली जातात.
हा दिवस दिवाळीतील दिवस असल्याने आनंद वाटत असला, तरी या दिवशी सूक्ष्मातून दाब असतो. ही तिथी असुराची असल्याने त्यांच्या वृत्तीप्रमाणे तिथीची निर्मिती होते. त्यामुळे या दिवशी बाह्य वातावरणाबरोबर स्वतःच्या अंतःकरणाचे निरीक्षण करा. हा दिवस क्षमेचा असल्याने या दिवशी चुका केलेल्या जिवांना क्षमा करून त्यांना नवीन संधी दिल्यास ते जीव पुढे जाऊन सत्त्वमय होतात. या दिवशी बर्याच ठिकाणी मांसाहार करण्याची प्रथा असली, तरी मांसाहार करणे टाळले पाहिजे. या दिवशी मांसाहार केल्यास जिवाची वृत्ती तामसिक बनू शकते.
बलीप्रतिपदा या दिवशी वातावरणात श्रीविष्णूचे १५ ते ३५ टक्के तत्त्व पृथ्वीतलावर येत असल्याने पृथ्वीवरील वातावरण विष्णुमय होते. त्याचा श्रीविष्णूच्या (श्रीकृष्ण, श्रीविष्णु आणि सत्यनारायण यांच्या) भक्तांना अधिकाधिक लाभ होतो. या दिवशी बळीराजाच्या प्रतिमेचे पूजन करून त्याला नैवेद्य दाखवला जातो; म्हणजेच त्याच्या क्षुधा-तृष्णा शांत केल्या जातात. त्यानंतर वर्षभर बळीराजाने आपल्या काळ्या शक्तीच्या बळावर पृथ्वीवरील जिवांना त्रास न देता इतर वाईट शक्तीं ना शांत, म्हणजेच आपल्या ताब्यात ठेवून त्यांना दिलेल्या पाताळाच्या राज्यातच गुण्यागोविंदाने नांदावे, हा त्या पूजेमागील पूजकाचा भाव असतो.
‘बलीप्रतिपदेला बळीची पूजा करतात. बळीने राक्षस कुळात जन्म घेऊनही त्याच्या पुण्याईने त्याच्यावर वामनदेवाची कृपा झाली. त्याने ईश्वरी कार्य समजून जनतेची सेवा केली. तो सात्त्विक वृत्तीचा आणि दानी राजा होता. प्रत्येक मानव हा सुरुवातीला अज्ञानी असल्यामुळे त्याच्या हातून वाईट कृत्य घडत असते; परंतु ज्ञान आणि ईश्वरी कृपा यांमुळे तो देवत्वाला पोहोचू शकतो, हे या उदाहरणावरून दिसून येते. अशा निर्भयतेने सत्यकर्माचे पालन केल्यावर त्याला मृत्यूभयच रहात नाही. यमसुद्धा त्याचा मित्र व बंधू होतो.
या दिवशी भगवंताने वामन अवतारात दाखवून दिले की, भगवंत हा अशा सर्वस्व अर्पण करणार्या भक्तांचा दाससुद्धा होण्याची तयारी ठेवतो. बली वास्तविक असुर घराण्यातील असूनसुद्धा त्याच्या उदार तत्त्वामुळे तसेच त्याने भगवंताला शरण जाऊन आपले सर्वस्व अर्पण केल्यामुळे भगवंताने त्याला योग्य मार्गदर्शन करून त्याच्या जीवनाला कलाटणी दिली आणि त्याचा उद्धार केला. त्याच्या राज्यात असलेले असुरवृत्तीला पोषक असे भोगमय विचार घालवून, त्या ठिकाणी त्यागाची भावना रुजवून, जनतेला दैवीविचार देऊन सुख आणि समृद्धी यांचे जीवन प्रदान केले.’
‘इंद्रपदाच्या अधिकार भोगाकरता दीन झालेल्या वडील भाऊ इंद्राला जगताचा एक तुकडा द्यावा; म्हणून बटु वामनाने (त्या पापहारक हरीने) बाह्यदृष्ट्या फसवून; पण आंतरिकदृष्ट्या बली चक्रवर्तीचे कोटीकल्याण करून दोन पावलांनी पृथ्वी आणि स्वर्गलोक व्यापून तिसर्या पावलाने बळीला पाताळात लोटले. आता बलिचक्रवर्ती पाताळाचा राजा असून जीवन्मुक्त स्थितीत स्वस्थ राहिला आहे. त्याचे प्रारब्ध त्याला इंद्रपद देणार आहे. त्याकरता तो जीवन्मुक्तावस्थेत शरीर धारण करून आहे. त्याने सर्व भोगांची अभिलाषा सोडल्यामुळे त्याचे मन तृप्त झाले आहे. जे कर्तव्य प्राप्त होईल ते शांत मनाने करायचे, अशी त्याची सवय असल्यामुळे तो स्वयं आनंदपूर्ण झाला आहे. बळीने ज्या मार्गाचे अनुसरण केले तोच `सत्य’ मार्ग आहे, तोच ऋत मार्ग आहे.
टिप्पणी पोस्ट करा