भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) दिग्गजांच्या दोन महत्त्वाच्या बैठका गुरुवारी दिल्लीत पार पडल्या. यानंतर काल रविवारी एक बैठक झाली, ज्यामध्ये देशाचे गृहमंत्री अमित शाह यांचा मुलगा आणि विद्यमान बीसीसीआय सचिव, जय शाह हे बीसीसीआयचे अध्यक्ष (BCCI president) होऊ शकतात हे जवळपास निश्चित झाले आहे. तर बीसीसीआयचे विद्यमान उपाध्यक्ष आणि काँग्रेसचे राज्यसभा सदस्य राजीव शुक्ला हे सचिवपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहेत. एका वृत्त संस्थेन यासंबंधी वृत्त दिले आहे.
गुरुवारी बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली, सचिव जय शाह, उपाध्यक्ष राजीव शुक्ला, माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन, आयपीएलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल, माजी सचिव निरंजन शाह, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा या बैठकीला उपस्थित होते. रविवारी झालेल्या बैठकीत यातील बहुतांश दिग्गजांचाही सहभाग होता. मागच्या बैठकीत एका बड्या मंत्र्यानी सर्वांची मते जाणून घेतली होती. रविवारी कोणत्या पदासाठी कोण उमेदवारी भरणार हे सांगण्यात आले. मात्र, बीसीसीआयच्या निवडणुकीत एखादे पद मिळेपर्यंत कोणताही बदल शक्य आहे. जे गेल्या अनेक निवडणुकांमध्ये दिसून आले आहे.
दैनिक जागरणने शुक्रवारीच सांगितले होते की यावेळी सौरव गांगुलीला (Sourav Ganguly) बीसीसीआय कार्यकारिणीत कोणतेही पद मिळणार नाही कारण भाजप नेतृत्व त्यांच्यावर नाराज आहे. कर्नाटकातून आलेल्या 1983 च्या विश्वचषक चॅम्पियन संघाचे सदस्य रॉजर बिन्नी, याशिवाय दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांचे पुत्र रोहन जेटली, ओडिशा क्रिकेट असोसिएशनचे संजय बेहरा, हरियाणा क्रिकेट संघाचे अनिरुद्ध चौधरी आणि आसाम क्रिकेट असोसिएशनच्या कोणत्याही व्यक्तीला पद जाऊ शकते.
सध्याचे सहसचिव जयेश जॉर्ज आणि आयपीएलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल हे पुढील निवडणूक लढवणार नाहीत. केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांचे बंधू आणि विद्यमान कोषाध्यक्ष अरुण सिंह धुमाळ हे देखील निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेऊ शकतात,अशीही बातमी आहे. १८ ऑक्टोबरला मुंबईत बीसीसीआयची कार्यकारिणीची निवड होणार आहे. 11 आणि 12 ऑक्टोबर रोजी नामांकन प्रक्रिया होणार आहे. 13 ऑक्टोबर रोजी अर्जांची छाननी होणार आहे. उमेदवार 14 तारखे पर्यंत अर्ज मागे घेऊ शकतो. यानंतर 15 ऑक्टोबरला पात्र उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार आहे. तर 18 ऑक्टोबरला अंतिम निकाल जाहीर होणार आहे. आतापर्यंतचा घडामोडी पाहता सर्व काही एकमताने होईल असेच दिसते.
टिप्पणी पोस्ट करा