पावसाने पुण्याला झोडपले

 


ब्युरो टीम: पुण्यात रात्री नऊ वाजल्यापासून ते पहाटे तीन वाजेपर्यंत पावसाने जोरदार हजेरी लावली. सोमवारी रात्री झालेल्या पावसामुळे पुण्याचा बहुतांश भागात पाणी शिरल्याचे चित्र पाहायला मिळालंय. पहाटेपासून पावसाने विश्रांती जरी घेतली असली, तरी अनेक भागात पाणी साचलं आहे. रात्रभर सुरु असलेल्या पावसाने पुणेकरांची दैना केली. या पावसामुळे हायवेवरील वाहतुकीवरही परिणाम झाला. 

पुण्यातील सोमवार पेठेत पावसानं रस्त्याच्या कडेला लावलेल्या दुचाकी पाण्याबरोबर वाहून गेल्या. पुण्यातील प्रसिद्ध दगडूशेठ मंदिरासह पुणे स्टेशनमध्येही पाणी शिरलं होतं, तसंच जंगली महाराज रस्ता, अलका टॉकीज चौक, फर्ग्युसन कॉलेज रोडवर गुडघाभर पाणी साचलं होतं.पुण्यातील शनिवार वाडा, येथील सखल भागात देखील पाणी साचलं. कोंढवा, हडपसर आणि येवलेवाढी भागातील रस्तेही जलमय झाले होते.

पुणे सोलापूर रस्त्यावर मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसाने सखल भागात पाणीच साचलं. त्यामुळे रस्त्यावरील वाहतुकीचा वेग मंदावला. पुणे सोलापूर रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळालं. पुण्यातील पावसाचा फटका रेल्वेला देखील बसला. त्यामुळे प्रवाशांना फलाटावरचं उभं राहण्याची वेळ आली होती. तिकीट काउंटरच्या ठिकाणीदेखील गुडघाभर पाणी साचलं होते. पहाटेपासून पावसाने विश्रांती घेतली असून पावसाचं पाणी ओसरण्यास सुरुवात झाली आहे. मात्र परतीच्या पावसाचा जोरदार तडाखा पुणेकरांना बसला. 

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने