नागपूर जवळील इतर राज्य उपचार सेवेसाठी नागपूरवर अवलंबून : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

 


विदर्भातील गरीब जनतेला सर्व प्रकारच्या अत्याधुनिक उपचार सेवा आणि आरोग्य निगडित सोईसुविधा मिळाव्या यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असून याच प्रयत्नातून एम्स नागपूरची स्थापना झालेली असल्याचे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज नागपुरात केले.  नागपूरच्या मिहान येथील अखिल भारतीय आर्युविज्ञान संस्था - एम्सच्या फिजीओलॉजी (शरीरविज्ञान) विभागाद्वारे 12 ते 16 ऑक्टोबर दरम्यान' असोसिएशन ऑफ फिजीओलॉजिस्ट ऑफ इंडिया - असोपीआय'  या संघटनेव्दारे आठव्या ‘असोपीकॉन -2022 ’ या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले असून  नितीन गडकरी यांच्या हस्ते या परिषदेचे उद्घाटन  करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. 

नागपूर जवळील इतर राज्य सुद्धा उपचार सेवेसाठी नागपूर येथील आरोग्य सेवेवर अवलंबून आहेत. थॅलीसिमिया, सिकलसेल, बोन मॅरो यासारख्या आजारासाठी एम्स नागपूरमध्ये निदान व्हावे आणि याचा लाभ विदर्भातील जनतेला व्हावा यासाठी एम्स नागपूरने आग्रही असायला हवे. यकृत, हृदय, किडनी प्रत्यारोपणाची सुविधा एम्स नागपूर मध्ये उपलब्ध होऊन अवयव प्रत्यारोपण संबधी जनजागृती होणे आवश्यक आहे. या विषयावर विस्तृत संशोधन आणि उत्तम यंत्रणा स्थापित होणे आवश्यक असल्याचे देखील गडकरी यांनी सांगितले. 

डॉक्टरांची कमतरता हा एक गंभीर विषय असून देशात वैद्यकीय महविद्यालयाची संख्या वाढली तर या समस्येला आटोक्यात आणता येईल.मागास क्षेत्रात आरोग्य सुविधा पुरविणे गरजेचे असून गरीब जनतेला माफक दरात ह्या अत्याधुनिक सेवा मिळायला हव्यात अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. उत्कृष्ट उपचार सेवेसाठी  नागपूर एम्स सदैव आग्रही असून या परिषदेचा पुरेपूर फायदा विद्यार्थी, तज्ञ यांना होईल असा विश्वास  एम्स नागपूरच्या संचालिका (मेजर जनरल नि.) डॉ. विभा दत्ता यांनी व्यक्त केला. 

यावेळी मंचावर रामटेकचे खासदार कृपाल तुमाने, एम्स पटनाचे कार्यकारी संचालक श्री.जी.के.पाल,  किंग जॉर्ज मेडिकल कॉलेजचे मुख्य प्राचार्य श्री. नरसिंग वर्मा  आणि परिषदेच्या आयोजन अध्यक्षा डॉ. मृणाल फाटक हे उपस्थित होते. 

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने