'आदिपुरुष चित्रपटातील काल्पनिकता आक्षेपार्ह': हिंदु जनजागृती समिती

 


‘आदिपुरुष’ या प्रभू श्रीरामांवर आधारित आगामी चित्रपटाचा टीझर प्रसिद्ध झाला आणि त्यावर अनेक आक्षेप घेतले जात आहेत, काही जण या चित्रपटाचे समर्थनही करत आहेत. खरेतर प्रभू श्रीरामांवर भव्य चित्रपट बनवणे, हे स्तुत्यच आहे; पण तो बनवतांना जर वास्तवाला फाटा देऊन काल्पनिकतेला महत्त्व दिले, तर असत्य इतिहास समाजावर बिंबवण्याचे पाप आपल्या माथी येते. ‘आदिपुरूष’ या चित्रपटाच्या टीझरमधून नेमके हेच ध्यानात येत आहे. या चित्रपटात पौराणिक संदर्भ सोडून जी काल्पनिक दृश्ये दाखवली आहेत, ती आक्षेपार्ह आहेत. याचा हिंदु जनजागृती समिती निषेध करते. प्रभू श्रीराम हे संपूर्ण हिंदु समाजाचे आराध्य दैवत आहे. त्यांच्यावर आधारित चित्रपट हा कलास्वातंत्र्याच्या नावाखाली काल्पनिक न बनवता धर्मग्रंथांचा अभ्यास करून बनवायला हवा, असे मत हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी व्यक्त केले आहे.

दिग्दर्शक ओम राऊत यांनी यापूर्वी चांगले चित्रपट बनवले आहेत, त्यामुळे या चित्रपटातूनही त्यांनी चांगला प्रयत्न केला असू शकतो; पण टीझरमधून तरी वरील काहीच आक्षेप लक्षात आले आहेत. पूर्ण चित्रपटात आणखीही आक्षेपार्ह दृश्ये असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी हिंदु जनजागृती समिती ओम राऊत यांच्याकडे मागणी करत आहे की, चित्रपट प्रदर्शनापूर्वी संत-महंत, इतिहास अभ्यासक, हिंदु संघटनांचे प्रतिनिधी यांना दाखवून त्यांच्या शंकांचे निरसन करावे आणि मगच चित्रपट प्रदर्शित करावा. आजकाल चित्रपटाबद्दल वाद निर्माण करून गल्ला भरणारे अनेक चित्रपट निर्माते आहेत. आपणही त्यांच्याप्रमाणे होऊ नये, अशी अपेक्षाही समितीने व्यक्त केली आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने