समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायम सिंह यादव यांचे आज मेदांता रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती, त्यांच्या तब्येतीत विशेष सुधारणा होत नव्हती, उलट त्यांची प्रकृती दिवसेंदिवस गंभीर होत चालली होती. अशा स्थितीत मुलायम सिंह यादव यांचे सोमवारी निधन झाले. 82 वर्षीय मुलायम यांना मूत्रमार्गात संसर्ग झाल्यामुळे 26 सप्टेंबरपासून गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, अखिलेश यादव यांनी समाजवादी पक्षाच्या ट्विटर हँडलवर मुलायम सिंह यांच्या निधनाची माहिती दिली. मुलायम यांच्या पार्थिवावर मंगळवारी सैफई येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. (Mulayam Singh Yadav Death)
ऑक्सिजनची पातळी कमी झाल्याने मुलायम यांना २ ऑक्टोबरला आयसीयूमध्ये हलवण्यात आले होते. मेदांता यांच्या पीआरओने सांगितले होते की, मुलायम सिंह यांना लघवीच्या संसर्गासोबत रक्तदाबाचा त्रास वाढला होता. प्रकृतीत सुधारणा न झाल्याने डॉक्टरांनी त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवले होते.
22 नोव्हेंबर 1939 रोजी सैफई येथे जन्मलेल्या मुलायम सिंह यादव यांचे शिक्षण इटावा, फतेहाबाद आणि आग्रा येथे झाले. मुलायम काही दिवस मैनपुरीतील करहल येथील जैन इंटर कॉलेजमध्येही प्राध्यापक होते. पाच भावंडांपैकी दुसरे असलेले मुलायम सिंह यांनी दोन विवाह केले होते. त्यांची पहिली पत्नी मालती देवी यांचे मे 2003 मध्ये निधन झाले. अखिलेश यादव हे मुलायम यांच्या पहिल्या पत्नीचे पुत्र आहेत. त्यांच्या निधनावर राजकारण्यांपासून सर्वसामान्यांपर्यंत सर्वांनी शोक व्यक्त केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील ट्विटरवरून मुलायमसिंह यादव यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी लिहले आहे "मुलायम हे तळागाळातील नेते होते, जे लोकांच्या अडचणी समजून घेत होते. त्यांनी आपले जीवन लोकनायक जयप्रकाश आणि डॉ लोहिया यांच्या विचारांना वाहून घेतले. आणीबाणीच्या काळात ते लोकशाहीचे महत्त्वाचे सैनिक होते. संरक्षण मंत्री म्हणून त्यांनी सशक्त भारतासाठी काम केले."
टिप्पणी पोस्ट करा