मनी लाँड्रिंग प्रकरणात अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या अडचणीत वाढ

 


मनी लाँड्रिंग प्रकरणात अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या (Jacqueline Fernandez) अडचणी कमी होताना दिसत नाहीत. २२ ऑक्टोबर रोजी जॅकलिन दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात सुकेश चंद्रशेखरशी (Sukesh Chandrashekhar) संबंंधित २०० कोटींच्या घोटाळा प्रकरणात हजर राहिली होती. तिचा अंतरिम जामीन १० नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आला आहे परंतु अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) तिच्या जामिनाला जोरदार विरोध केला.

विविध मीडिया रिपोर्ट्सनुसार, जॅकलिनच्या नियमित जामिनाविरोधात ईडीने जबाब दाखल केला आहे. यामध्ये ईडीकडून काही गौप्यस्फोट करण्यात आले आहेत. जॅकलिनने तपासादरम्यान पुराव्यांशी छेडछाड केल्याचे ईडीचे म्हणणे आहे. जॅकलिनने तिच्या मोबाईलमधील डेटा डिलीट केला होता. तपासादरम्यान भारत देशातून पळून जाण्याचाही प्रयत्न केल्याचे ईडीचे म्हणणे आहे. पण ती यशस्वी होऊ शकली नाही. जॅकलिनने तपासात कधीही सहकार्य केले नाही, असेही ईडीचे म्हणणे आहे.

ईडीने विविध मुद्दे मांडत पटियाला हाऊस कोर्टात जॅकलिनला जामीन देण्याबाबत विरोध केला आहे. असेही समोर आले आहे की, ईडीने जबाबात असे म्हटले आहे की जॅकलिनचे एकंदरित वागणे व्यवस्थित नव्हते. ती पुरावे आणि साक्षीदारांना नुकसान पोहोचवू शकते. या आधी कोर्टाने जॅकलिनला दिलासा दिला आहे. न्यायालयाने पुढील सुनावणीपर्यंत तिला अटक करण्यास स्थगिती दिली असून पुढील सुनावणी १० नोव्हेंबरला होणार आहे.

सुकेश चंद्रशेखर २०० कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात आरोपी असून जॅकलिन सहआरोपी आहे. १७ ऑगस्ट रोजी जॅकलिनला ईडीने जॅकलिनविरोधात एक चार्जशीट दाखल केलेली. तिला समनही धाडण्यात आले. यानंतर तिच्या वकिलांनी जामिनासाठी अर्ज केला होता. तिला अंतरिम जामीन मिळाला असला तरी तिला नियमित जामीन मिळावा याकरता ही सुनावणी सुरू आहे आणि याला ईडीचा विरोध आहे 

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने