आता किफायतशीर किमतीत होऊ शकता आपल्या विमानाचे मालक

 


स्वतःसाठी खासगी विमान खरेदी करणे ही एक अवघड प्रक्रिया आहे. त्यासाठी लागणाऱ्या टॅक्सपासून ते विमानाच्या मेंटेनन्सपर्यंतचा खर्च कोणत्याही सामान्य माणसाला परवडत नाही. हा खर्च दर महिन्याला काही लाखांपर्यंत असतो. मात्र आता केंद्र सरकारच्या या निर्णयाने तुम्हाला दिलासा मिळू शकतो व तुम्ही विमानाचे मालक बनू शकता 

केंद्र सरकारनं खासगी विमानांची खरेदी सोपी करण्यासाठी विमान वाहतूक क्षेत्रात फ्रॅक्शनल ओनरशिप मॉडेल अर्थात अंशात्मक मालकी मॉडेल आणले आहे. या मॉडेल अंतर्गत एका पेक्षा जास्त लोक मिळून खासगी विमान किंवा हेलिकॉप्टर खरेदी करून त्याचा वापर करु शकतात. चला तर, फ्रॅक्शन ओनरशिप म्हणजे काय? तुम्ही खासगी विमानाचे मालक कसे बनू शकता? ते समजून घेऊ.

फ्रॅक्शनल ओनरशिप मॉडेल अंतर्गत, अनेक लोक किंवा कंपन्या त्यांना हवे असल्यास एकत्र येऊन विमान खरेदी करू शकतात. या मॉडेल अंतर्गत तुम्ही विमानाचे आंशिक मालक असताल. या मॉडेल अंतर्गत, एका विमानाचे जास्तीत जास्त 16 मालक असू शकतात, याचाच अर्थ जास्तीत जास्त 16 जण एकत्र येऊन एक विमान खरेदी करु शकतात. विमानात प्रत्येक मालकाची किमान 6.25 टक्के हिस्सेदारी असणे आवश्यक आहे. सुरुवातीला हे धोरण 5 वर्षांसाठी लागू केले जाईल. विमानाचे मालक आणि फ्रॅक्शनल कंपनी यांच्यात किमान 3 वर्षांचा करार असणे आवश्यक असेल. तुम्ही विमान खरेदीसाठी किती गुंतवणूक केली आहे,  त्यानुसार तुम्ही वर्षातून किती तास विमानाचा वापर करू शकता, हे ठरवले जाते. ही वेळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार निवडू शकता. विमानाच्या खासगी वापराबरोबरच काही परवानग्या घेतल्यानंतर त्याचा व्यावसायिक वापरही करता येईल.

फ्रॅक्शनल ओनरशिपचा सर्वात मोठा फायदा म्हणजे पैशाची बचत. विमान खरेदीसाठी कोट्यावधी रुपयांची गरज आहे. पण येथे ही रक्कम विभागल्याने हा भार कमी होईल. तसेच विमान खरेदी केल्यानंतर दररोज होणारा अवाढव्य खर्चही आपापसात विभागला जाणार आहे. त्यामुळे आर्थिक बोजा कमी होईल. दुसरा मोठा फायदा म्हणजे खासगी विमान असल्याने  तुमचा प्रवास सोयीस्कर आणि सोपा होईलच, शिवाय तो तुम्हाला तुमच्या वेळेनुसार करता येईल.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने