चिंतन शिबिर हे सहकारी संघराज्याचे ठळक उदाहरण : नरेंद्र मोदी

 


हरयाणातील सूरजकुंड इथे 27  व 28 ऑक्टोबर 2022 रोजी राज्यांच्या गृहमंत्र्यांचे चिंतन शिबीर सुरु आहे. राज्यांचे गृह सचिव, पोलीस महासंचालक, केंद्रीय सशस्त्र दलांचे महासंचालक आणि केंद्रीय पोलीस संघटना या शिबिरात सहभागी झाल्या आहेत. देशांतर्गत सुरक्षिततेसंदर्भातील बाबींविषयी धोरण आखताना या बाबींच्या राष्ट्रीय पातळीवरील स्थितीचे आकलन व्हावे, असा या चिंतन शिबिराचा हेतू आहे. 

आज या शिबिरास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केले या प्रसंगी त्यांनी सणासुदीच्या काळात शांततापूर्ण वातावरण कायम राखण्यासाठी कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सज्जतेचे कौतुक केले. चिंतन शिबिर हे सहकारी संघराज्याचे ठळक उदाहरण आहे, असे ते म्हणाले. राज्यघटनेनुसार कायदा आणि सुव्यवस्था ही राज्यांची जबाबदारी असली तरी देशाच्या एकतेशी आणि अखंडतेशी त्यांचा तितकाच संबंध आहे. प्रत्येक राज्याने परस्परांकडून शिकले पाहिजे, परस्परांकडून प्रेरणा घेतली पाहिजे, देशाच्या कल्याणासाठी काम केले पाहिजे, हा संविधानाचा गाभा आहे आणि देशवासियांप्रती ही आपली जबाबदारी आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

सध्या सुरू असलेल्या अमृत काळाचा संदर्भ देत पंतप्रधान म्हणाले की या अमृत काळात पंच प्रणांचे सार आत्मसात करत एक अमृत पिढी उदयाला येईल. 'पंच प्रण' हे सुशासनासाठी मार्गदर्शक असले पाहिजेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. जेव्हा देशाची ताकद वाढेल, तेव्हा देशातील प्रत्येक नागरिकाची आणि प्रत्येक कुटुंबाची शक्तीही वाढीला लागेल, असे पंतप्रधान म्हणाले. हे सुशासन आहे, इथे प्रत्येक राज्यातील तळागाळातील व्यक्तीपर्यंत सुशासनाचे लाभ पोहोचतात असे सांगत, कायदा आणि सुव्यवस्था आणि राज्यांचा विकास यांच्यातील परस्परसंबंध महत्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. 

संपूर्ण कायदा आणि सुव्यवस्था यंत्रणा विश्वसनीय असणे खूप महत्वाचे आहे. जनमानसात त्यांच्याबद्दल विश्वास आणि समज असणेही गरजेचे आहे, असे पंतप्रधान म्हणाले. नैसर्गिक आपत्तींच्या काळात एनडीआरएफ आणि एसडीआरएफला सर्वदूर ओळख प्राप्त झाल्याचे पंतप्रधानांनी आवर्जून सांगितले. गुन्ह्याच्या ठिकाणी पोलिसांचे आगमन म्हणजे सरकारचे आगमन मानले जाते असे सांगत, कोरोनाच्या काळात पोलिसांची प्रतिष्ठाही वाढली, असे पंतप्रधान म्हणाले. या बलांमध्ये बांधिलकीची कमतरता नाही मात्र लोकांच्या मनात पोलिसांबद्दलचा योग्य समज अधिक दृढ करण्याची गरज आहे, असे त्यांनी सांगितले. या संदर्भात त्यांना मार्गदर्शन करणे, ही सातत्यपूर्ण प्रक्रिया असली पाहिजे, असे ते म्हणाले.

स्वातंत्र्यदिनी पंतप्रधानांनी आपल्या भाषणात जो ‘पंच प्रण’ यांचा उल्लेख केला होता, तो नजरेसमोर ठेवून या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. त्यातून याबाबत धोरण आखणी व अंमलबजावणीसाठी केंद्र व राज्य पातळ्यांवर अधिक योग्य रितीने समन्वय साधणे शक्य होईल, अशी अपेक्षा आहे. पोलीस दलांचे आधुनिकीकरण, सायबर गुन्ह्यांबाबत व्यवस्थापन, गुन्हे न्यायिक प्रणालीत माहिती-तंत्रज्ञानाच्या वापरात वाढ, सीमेलगतच्या प्रदेशांचे व्यवस्थापन, किनारपट्टीची सुरक्षा, महिलांची सुरक्षितता आणि अंमली पदार्थांची तस्करी आदी विविध विषयांवर शिबिरात चर्चा होणार आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने