गांधीनगर ते मुंबई सेंट्रल दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेनला पुन्हा एकदा अपघात

 


गांधीनगर ते मुंबई सेंट्रल दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेनला पुन्हा एकदा अपघात झाला असून, ट्रेनच्या इंजिनचे नुकसान झाले आहे. याआधी 6 आणि 7 ऑक्टोबरला सलग दोन दिवस वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन अपघाताची शिकार झाली होती. पहिल्या दिवशी 6 ऑक्टोबर रोजी ट्रेन म्हशींच्या कळपावर धडकली, ज्यामुळे इंजिनच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले. दुसऱ्या दिवशी 7 ऑक्टोबर रोजी वंदे भारत एक्स्प्रेस गाडी एका गायीला धडकली, त्यामुळे ट्रेनच्या इंजिनच्या  पुढचे पॅनल खराब झाले. आता वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे अपघाताची ही तिसरी वेळ आहे. भारतीय रेल्वेकडून सांगण्यात आले की, 'आज मुंबई सेंट्रलहून गांधीनगरच्या दिशेने जाणाऱ्या वलसाडमधील एका रेल्वे स्थानकाजवळ वंदे भारत एक्सप्रेस गाडी गुरांना धडकली. अपघातानंतर ट्रेन सुमारे 15 मिनिटे थांबवण्यात आली होती.

या अपघातामुळे पुढचा फलक वगळता ट्रेनचे कोणतेही नुकसान झाले नसल्याचे भारतीय रेल्वेकडून सांगण्यात आले आहे. ट्रेन सुरळीत चालू आहे. मात्र या अपघातात एक बैल जखमी झाला. याआधी वंदे भारत एक्स्प्रेसला रेल्वे अपघात झाला तेव्हा ट्रेनच्या ताकदीवर प्रश्न उपस्थित झाले होते, त्याबाबत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नांना उत्तर देताना रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले होते की, "भारतातील बहुतांश भागात ट्रॅक जमिनीवर आहे. त्यामुळे प्राण्यांच्या अपघाताची प्रकरणे येत राहतात. त्याला सामोरे जाण्यासाठी ट्रेनची रचना त्याच पद्धतीने करण्यात आली आहे. "ट्रेन भक्कम आहे, तिची रचना ग्लोबल आहे. पुढचा भाग अशा प्रकारे बनवला आहे की काही बिघाड झाला तर लगेच दुरुस्त करता येईल."

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने