सोनिया-राहुल यांच्या उपस्थितीत मल्लिकार्जुन खर्गे यांनी अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला

 


काँग्रेसचे नवनिर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची बुधवारी एआयसीसी मुख्यालयात काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी, माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह अनेक प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय अध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला. सुमारे दोन दशकांत पहिल्यांदाच एका बिगर गांधी कुटुंबातील व्यक्ती काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष पदी निवडला आहे. याआधी सीताराम केसरी हे बिगर गांधी अध्यक्ष होते.

तत्पूर्वी काँग्रेसच्या पूर्व अध्यक्षा सोनिया गांधी, माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि पक्षाच्या निवडणूक प्राधिकरणाचे अध्यक्ष मधुसूदन मिस्त्री यांनी मल्लिकार्जुन खर्गे  यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यानंतर मधुसूदन मिस्त्री यांनी त्यांना निवडणूक जिंकल्याचा दाखला देत काँग्रेस पक्षात अंतर्गत लोकशाही असल्याचे सांगितले.  तत्पूर्वी बुधवारी सकाळी मल्लिकार्जुन खर्गे यांनी सर्वप्रथम राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या समाधीवर पोहोचून त्यांना श्रद्धांजली वाहिली. यानंतर त्यांनी माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि बाबू जगजीवन राम यांच्या समाधीला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, प्रदेश काँग्रेस अध्यक्ष गोविंद सिंग दोतसरा, कॅबिनेट मंत्री लालचंद कटारिया, माजी मंत्री रघु शर्मा, हरीश चौधरी, एआयसीसी सचिव धीरज गुर्जर, कुलदीप इंदोरा, कार्यसमिती सदस्य रघुवीर मीणा आणि पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस भंवर जितेंद्र सिंह हेही या कार्यक्रमाला उपस्थित होते. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी व्यासपीठावर बोलताना मल्लिकार्जुन खर्गे यांना राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव असून त्यांचा अनुभव पक्षासाठी उपयोगी पडेल, असे सांगितले. तसेच बदल हा जगाचा नियम असल्याचे सोनिया गांधी यांनी नमूद केले. 

मल्लिकार्जुन खर्गे यांच्या समोर आता हिमाचल प्रदेश आणि गुजरात विधानसभा निवडणुक हे त्यांच्यासमोर मोठे आव्हान येणाऱ्या काळात उभे असेल, तेथे त्यांची कसोटी लागणार आहे. यासोबतच पक्षात पसरलेली दुफळी आणि 2024 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पक्षाला सत्तेत कसे आणायचे हे देखील त्यांच्यासमोर मोठे आव्हान आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने