देशातील पहिला खाजगी क्षेत्रातील वाहतूक विमान निर्मिती प्रकल्प C-295 ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट मॅन्युफॅक्चरिंग प्लांटची पीएम मोदींनी गुजरातमधील वडोदरा येथे पायाभरणी केली. 21,000 कोटी रुपये खर्चाच्या या प्लांटमध्ये टाटा समूह आणि स्पॅनिश कंपनी एअरबस हे संयुक्तपणे हवाई दलासाठी विमानांची निर्मिती करणार आहेत.
भारतीय वायुसेनेसाठी (IAF) C-295 वाहतूक विमान टाटा अॅडव्हान्स्ड सिस्टम्स लिमिटेड आणि एअरबस डिफेन्स आणि स्पेस, स्पेन यांच्या सहकार्यातून वडोदरामध्ये तयार केले जाईल. अशा प्रकारचा हा पहिलाच प्रकल्प आहे ज्यामध्ये लष्करी विमानाची निर्मिती खासगी कंपनीद्वारे केली जाणार आहे. येथे तयार करण्यात आलेले C-295 विमान नागरी कामांसाठीही वापरले जाऊ शकते. या प्रकल्पाची एकूण किंमत 21,935 कोटी रुपये आहे.
या प्रसंगी बोलताना पंतप्रधान म्हणाले की, आज आपण भारताला जगातील सर्वात मोठे उत्पादन केंद्र बनवण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलत आहोत. ते म्हणाले की, भारत आज स्वतःचे फायटर जेट बनवत आहे. आज भारत स्वतःचे टँक बनवत आहे, स्वतःची पाणबुडी, औषधे, लस, इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स, मोबाईल फोन आणि कार बनवत आहे,आणि हे प्रॉडक्ट अनेक देशांमध्ये लोकप्रिय आहेत. आता भारत वाहतूक विमानांचाही मोठा उत्पादक बनणार आहे. भारत लवकरच मोठ्या प्रवासी विमानांची निर्मिती करणार आहे, ज्यावर 'मेड इन इंडिया' असे अभिमानाने लिहिलेले असेल.
पंतप्रधान म्हणाले की, उत्पादन प्रकल्पामध्ये देशाच्या संरक्षण आणि वाहतूक क्षेत्रात परिवर्तन घडवून आणण्याची ताकद आहे. भारतीय संरक्षण क्षेत्रात एवढी मोठी गुंतवणूक होण्याची ही पहिलीच वेळ आहे. येथे तयार होणारी वाहतूक विमाने केवळ आपल्या सैन्याला बळ देणार नाहीत तर विमान निर्मितीसाठी एक नवीन परिसंस्था विकसित करेल. ते म्हणाले की, सांस्कृतिक आणि शैक्षणिक हब म्हणून प्रसिद्ध असलेले वडोदरा आता विमान वाहतूक क्षेत्रातील हब म्हणून नवीन ओळख निर्माण करेल. ते म्हणाले की या प्रकल्पाशी 100 हून अधिक एमएसएमई देखील सहभागी आहेत.
पंतप्रधान म्हणाले की, जगातील सर्वात वेगाने वाढणारे विमान वाहतूक क्षेत्र आज भारतात आहे. ते म्हणाले की, हवाई वाहतुकीच्या बाबतीत आपण जगातील पहिल्या तीन देशांमध्ये पोहोचणार आहोत. येत्या १५ वर्षांत भारताला 2000 हून अधिक विमानांची गरज भासणार आहे. भारताने त्याची तयारी सुरू केली आहे. ते म्हणाले की, भारत स्वस्त दरात आणि उच्च दर्जाच्या उत्पादनाची निर्मिती करत आहे.
पंतप्रधान म्हणाले की, गेल्या आठ वर्षांत 160 हून अधिक देशांतील कंपन्यांनी भारतात गुंतवणूक केली आहे. अशी परकीय गुंतवणूक काही उद्योगांपुरती मर्यादित नाही, तर ती अर्थव्यवस्थेच्या 61 क्षेत्रांमध्ये पसरलेली आहे आणि भारतातील 31 राज्यांमध्ये ती व्यापलेली आहे. एकट्या एरोस्पेस क्षेत्रात US$ 3 अब्ज पेक्षा जास्त गुंतवणूक करण्यात आली आहे. 2000 ते 2014 या वर्षात केलेल्या गुंतवणुकीपेक्षा 2014 नंतर या क्षेत्रातील गुंतवणूक 5 पटीने वाढली. आमचे संरक्षण उत्पादन 2025 पर्यंत US$25 अब्ज पर्यंत वाढवण्याचे आमचे ध्येय आहे. आमची संरक्षण निर्यात 5 अब्ज डॉलर्सच्या वर जाईल.
टिप्पणी पोस्ट करा