Diwali 2022 Muhurat Trading: वेळ ठरली; दिवाळीच्या खास काळात कधी करताल शेअरमध्ये गुंतवणूक, जाणून घ्या

 



ब्युरो टीम : अंध:काराकडून प्रकाशाकडे तर अज्ञानाकडून ज्ञानाकडे नेणारा सण म्हणजे दीपावली. वर्षभरात येणाऱ्या सण-उत्सवांचा राजा मानल्या गेलेल्या दीपोत्सवाची सुरुवात वसुबारस सणानं केली जाते. आजपासून देशभरात दिवाळीचे आनंदी वारे सगळीकडे वाहू लागले आहे. दिवाळीला भारतीय शेअर बाजारात सुट्टी असली तरी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी बाजार तासभर उघडतो. शेअर बाजारात दिवाळीनिमित्त खास ट्रेडिंग करण्याची परंपरा खूप जुनी आहे, ज्याला मुहूर्त ट्रेडिंग म्हणतात. चला तर यंदा ही मुहूर्त ट्रेडिंगचा नेमका मुहूर्त काय आहे ते जाणून घेऊयात.

शेअर बाजारात दिवाळीच्या दिवशी एक तास मुहूर्त ट्रेडिंग करण्याची परंपरा पाच दशकांहून अधिक जुनी आहे. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) मध्ये १९५७ मध्ये आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) मध्ये १९९२ मध्ये मुहूर्त ट्रेडिंगची प्रथा सुरू झाली. मुहूर्ताचा व्यवहार हा पूर्णपणे परंपरेशी निगडित असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. बहुतेक लोक या दिवशी शेअर्स खरेदी करण्यास प्राधान्य देतात, जरी ही गुंतवणूक सहसा खूप छोटी आणि प्रतीकात्मक असते.

यावेळी दिवाळीच्या शुभमुहूर्तावर अर्थात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी भारतीय शेअर बाजार  २४ ऑक्टोबर २०२२ रोजी तासभरासाठी उघडतील. बीएसई आणि एनएसईवर उपलब्ध सूचनेनुसार इक्विटी, इक्विटी आणि डेरिव्हेटिव्ह सेगमेंटमधील ट्रेडिंग संध्याकाळी ६:१५ वाजता सुरू होईल आणि एक तासानंतर ७:१५ वाजता बंद होईल. तर प्री-ओपन सत्र संध्याकाळी ६:०० वाजता सुरू होईल आणि ६:०८ वाजता संपेल. दिवाळी ही नवीन वर्षाची सुरुवातही होते. यावेळी दिवाळीपासून संवत २०७९ सुरू होणार आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने