Diwali: आली दिवाळी, स्वयंपाकघर स्वच्छ करण्याचे नका घेऊ टेन्शन, वापरा ‘या’ टिप्स

 


ब्युरो टीम : दिवाळीचा (Diwali) सण जवळ आलायं. दिवाळी म्हटलं की ज्येष्ठांपासून लहानांपर्यंत सर्वांमध्ये उत्साह दिसतो. शॉपिंग सह फराळ, फटाके, पंचपक्वान्नांचा छान बेत दिवाळीत रंगतो. पण त्या सर्वाआधी महत्त्वाची गोष्ट करायची असते जी अनेकांच्या नाकीनऊ आणते, ती म्हणजे दिवाळीची साफसफाई. त्यातही स्वयंपाकघर स्वच्छ  करणं हे मोठं आव्हानच. मात्र,स्वयंपाकघर स्वच्छ करण्याच्या काही सोप्या टिप्स (Kitchen Cleaning Tips) आहेत, ज्या वापरल्यामुळे तुमचं स्वयंपाकघर स्वच्छ करण्याचे काम अधिकच सोपे होईल. 

24 ऑक्टोबरपासून दिवाळी सुरू होत आहे. तर, 23 ऑक्टोबरला धनत्रयोदशी (Dhanteras) असून त्यापूर्वीच घराची साफसफाई करावी, अशी प्रथा आहे. स्वच्छ घरातच देवी लक्ष्मी निवास करते, असे मानले जाते. अशा परिस्थितीत घरातील स्वयंपाकघर स्वच्छ करणे हे महिलांसाठी मोठे आव्हान ठरू शकते. कधीकधी ते साफ करण्यासाठी दुप्पट मेहनत करावी लागते. घराचे स्वयंपाकघर जरी लहान असले तरी ते व्यवस्थित आणि स्वच्छ असणे खूप गरजेचे आहे. चला तर मग आम्ही तुम्हाला अशाच काही हॅक्सबद्दल  माहिती देत आहोत, ज्याचा अवलंब करून तुम्ही सहज स्वयंपाकघर स्वच्छ करू शकता ‘या’ आहेत टिप्स.

- स्वयंपाक घरातील बहुतेक घाण गॅस स्टँडजवळ पाहायला मिळते. याठिकाणी भरपूर तेल आणि ग्रीस जमा होते, जे स्वच्छ करणे खूप कठीण होते. ते स्वच्छ करण्यासाठी तुम्ही भांडी धुण्यासाठी वापरत असलेला स्क्रब वापरू शकता. त्या स्क्रबरला साबण लावा आणि फरशी, स्वयंपाक घरातील टाइल्स घासून घ्या. याशिवाय व्हिनेगर, बेकिंग सोडा, अमोनिया आदींचा वापर करून तुम्ही टाइल्स चमकवू शकता.

-  स्वयंपाकघरातील फरशी स्वच्छ करण्याचे कामही अवघड असते. यासाठी तुम्ही स्वच्छ पाणी घ्या आणि त्यात भांडे धुण्याची पावडर, साबण टाका. त्यानंतर स्क्रबरने फरशी नीट घासून घ्या. तुमच्या स्वयंपाकघराची फरशी छान चमकू लागेल.

-किचन सिंक स्वच्छ करणे अनेकदा खूप कठीण काम असते. ते स्वच्छ करण्यासाठी, सर्वात प्रथम त्यात गरम पाणी टाका. त्यानंतर व्हिनेगर आणि बेकिंग पावडर टाकून ते स्वच्छ करावे. सिंकच्या स्वच्छतेसाठी त्यामध्ये अॅसिड टाकू नका. कारण अॅसिड टाकल्यास त्याचे डाग सिंकला पडू शकतात.

-किचन कॅबिनेट स्वच्छ करणे कधीकधी खूप कठीण असते. हे स्वच्छ करण्यासाठी व्हिनेगर आणि डिश वॉश लिक्विड साबण वापरता येईल. यासोबतच तुम्ही चांगले स्क्रबर वापरू शकता. काही वेळात तुमचे कॅबिनेट पूर्णपणे स्वच्छ होईल.

-गॅस शेगडी साफ करणे हे सर्वात मोठे आव्हान आहे. शेगडीचा वापर स्वयंपाकघरात सर्वाधिक केला जातो. त्यामुळे गॅस शेगडीची व्यवस्थित स्वच्छता करणे आवश्यक आहे. गॅस शेगडी खोलून स्वच्छ करा. जर तुम्हाला गॅस शेगडी खोलून स्वच्छ करणे शक्य नसेल तर निदान तिचे बर्नर काढून ते स्वच्छ करा.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने