Diwali : दिवाळीचा पहिला दिवस 'वसुबारस' जाणुन घ्या महत्व, मुहूर्त व पूजा पद्धती

 


शुक्रवार दिनांक 21 ऑक्टोबर 2022 रोजी गोवत्स द्वादशी अर्थात वसुबारस साजरी केली जाईल व दिवाळीला सुरवात होईल. गोवत्स द्वादशी हा सण दीपावली किंवा अमावस्येपूर्वी द्वादशी तिथीला साजरा केला जातो. वसुबारस सण कसा साजरा करतात? या दिवशी काय करावे आणि काय करू नये? वसुबारसचे व्रत कसे करावे? यावर्षी पूजनाचा मुहूर्त काय हे आपण जाणून घेऊया...

यादिवशी पूजन करण्यामागे एक प्राचीन कथा आहे, पूर्वीच्या काळी पृथू राजा पुथ्वीवर राज्य करीत असताना पृथ्वीवर नैसर्गिक संकट आले तेव्हा त्याने गोमातेचेच पूजन केले. गोमातेच्या आशीर्वादाने संकटात सापडलेली सृष्टी पुन्हा नवजीवनाने तरारली. राजाने गोमातेचे ज्या दिवशी पूजन केले तो दिवस म्हणजे हा द्वादशीचा दिवस याच दिवशी गोमातेच पूजन करून वसुबारस साजरी केले जाते.  वसुबारसेला गायीला नैवेद्य  दाखवितात तसेच काही ठिकाणी तिला मातृत्वाचे प्रतीक म्हणून साडी चोळी अर्पण करतात. पूजेच्या वेळी जी रांगोळी काढण्याची प्रथा आहे त्यामध्ये “गोपद्म’ म्हणजे गायीची पावले काढण्याची प्रथा आहे.

गाईचे पूजन कसे कराल या दिवशी स्त्रिया उपवास करतात व गाई-वासरांची पूजा झाल्यानंतर आपला उपवास सोडतात. जर कोणाच्या घरी गाय-वासरू नसेल तर त्याने घराच्या आसपासच्या गाय-वासराची पूजा करावी. घराच्या आजूबाजूला गाय-वासरू न मिळाल्यास ओल्या मातीने गाय-वासरू यांच्या मूर्ती बनवून त्यांची पूजा करावी. असे मानले जाते की सर्व यज्ञ केल्याने आणि सर्व तीर्थात स्नान केल्याने जे पुण्य प्राप्त होते, ते पुण्य गाईची सेवा, पूजा आणि गाईला चारा दिल्याने सहज मिळते. आपण घरी गाईची तिच्या वासरासह मूर्ती पाटावर मांडावी किवां गाय वासरू असेल तर तेथे जाऊन खालील प्रमाणे पूजन करावे. 

सर्वप्रथम गाय व वासराच्या पायावर जल (पाण्यात हळदी कुंकू अक्षता टाकून घ्याव्या) अर्पण करावे, जल अर्पण करताना पुढील मंत्र उच्चारावा 

'क्षीरोदार्णवसंभूते सुरासुर नमस्कृते I

सर्व देवमये मात गृहाणार्घ्य नमोsसुते

तत: सर्वमये देवी सर्वदेवैरलङ्कृते |

मातर्ममाभिलषितं सफलं कुरू नन्दिनि ||'

यानंतर गाय आणि वासराच्या कपाळावर चंदनाचा तिलक लावा, नंतर दोघांनाही फुल अर्पण करावे किवां फुलांची माळ घालावी. यानंतर गाईला साडी चोळी अर्पण करावी (नंतर ती गाईची सेवा करणाऱ्यास दान करावी), गाय आणि वासराच्या समोर धूप लावा. नंतर तिला बाजरीची भाकरी किवां बाजरीचा नैवेद्य द्यावा. गाईला नैवेद्य  खाऊ घालताना पुढील मंत्र उच्चारावा 'सुरभिसत्त्वम जगन्मात र्देविविष्णुपदे स्थिता I सर्वदेवमये ग्रासं मया दत्त मिंदग्रस॥' यानंतर दीप प्रज्वलित करून गाय आणि वासराला ओवाळावे व पुढील आरती म्हणावी. 

धेनू माय जगत् जननी I लोकत्रयपी ताप शमनी I

अखिल जगतास मोक्षदानी | जिचेनी सालंकृत अवनी I

निगमा गमे जिला गाती I वंदित सुरवर मुनि जन I

पुनितप तित जन I घेता दर्शन प्रियकर शिवसांबा |

पुरवी  सौख्यद जगदंबा |धेनू माय जगत् जननी  ॥१॥

गोमुत्रांतवसे गंगा |कमला गोमयांत रंगा l

अखिल देवता जिचे अंगा l सदाजी प्रियकर श्रीरंगा |

जियेचे नेत्रसुर्य चंद्र l पहा उपेद्र | गोकुळी कृष्ण |

बाळ अवतार l नका धरू गोवर्धन धरुनी I

रक्षी गोवत्स कृपा करूनी Iधेनू माय जगत् जननी॥२॥

वसुबारस पूजा मुहूर्त (Vasu Baras 2022 Puja Muhurat) गोवत्स द्वादशी अर्थात शुक्रवार, 21 ऑक्टोबर रोजी वसुबारस  पूजा मुहूर्त  संध्याकाळी 06:09 ते 08:39 पर्यंत आहे.  

गोवत्स द्वादशी या दिवशी सौभाग्यवती स्त्रिया उपवास करतात, एकभुक्त राहून सवत्स गायीची पूजा करतात तसेच या दिवशी गहू, मूग खात नाही. उपवास करणाऱ्या महिला या दिवशी पूजेनंतर बाजरीची भाकरी आणि गवारीच्या शेंगांची भाजी खाऊन उपवास सोडतात. या दिवशी दूध, दुधाचे पदार्थ, तळलेले तसेच तव्यावर बनवलेले पदार्थ खात नाहीत,अशी माहिती astrozoom चे पंडित संदीप यांनी दिली 

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने