Navratri Culture: महाराष्ट्रातील साडेतीन शक्ती पीठातील एक अर्धे पीठ श्री क्षेत्र वणी.

 


सप्तश्रृंग गड हे भारतातील नाशिकजवळील वणी येथे आहे. हे मंदिर महाराष्ट्राच्या साडेतीन शक्तीपीठां पैकी अर्धे पीठ म्हणून प्रसिद्ध आहे. मंदिरात उच्चासनावर उभी असलेली देवीची मूर्ती नऊ फूट उंच आहे. तिला अठरा हात आहेत. ती पाषाण मुर्ती स्वयंभू आहे. पाणीदार नेत्र, सरळ पण किंचीत कललेली मान, अठरा हातात अठरा विविध आयूधे असा देवीचा थाट आहे. महिषासुराचा वध करण्यासाठी मार्कंडेय ऋषींनी यज्ञ केला होता. त्या यज्ञातून ही देवी प्रकट झाली असे मानतात. सिंहासनावर आरुढ झालेल्या देवीच्या अठरा हातात निरनिराळी अस्त्रे होती. तिने त्या राक्षसाचा नि:पात केला. म्हणून या देवीला ‘महिषासूरमर्दिनी’ असेही म्हणतात. सती (भगवान शिव यांची पहिली पत्नी) तिचा उजवा हात या ठिकाणी कोसळल्याचेही मानले जाते. 

सप्तशृंगी मंदिर हे दोन मजली मंदिर असून वरच्या मजल्यावर देवीचे मंदिर आहे. देवीची प्रतिमा पायथ्याशी असलेल्या गुहेत कोरलेली आहे. डोंगराच्या निखळ  खडकावर देवी स्वयंभू असल्याचे म्हटले जाते. तिच्याभोवती सात शिखरे आहेत, म्हणून तिचे नाव आहे: सप्त श्रृंगी माता (सात शिखरांची आई). मंदिरासमोरील अंगणात त्रिशूल आहे ज्याला घंटा व दिव्यांनी सुशोभित केले आहे. देवीची इतर मौल्यवान दागिने आहेत जी सामान्यत: वणी येथे सुरक्षित कोठडीत ठेवली जातात पण खास सणाच्या दिवसात देवता सजवण्यासाठी वापरल्या जातात. देवीची प्रतिमा सिंधूर नावाच्या गेरुने चमकदार लाल रंगविली आहे, जी या प्रदेशात चांगली मानली जाते.

येथे शारदीय नवरात्र उत्सव देखील हर्ष उल्हासात साजरा केला जातॊ नेहमीप्रमाणे, सहा वाजता काकड आरती होते. आठ वाजता देवीच्या महापूजेला सुरुवात होते. या पूजेमध्ये मूर्तीला पंचामृत स्नान घालण्यापासून ते पैठणी अथवा शालू नेसवून तिचा साज-शृंगार केला जातो. पानाचा विडा मुखी दिला जातो. पेढा आणि वेगवेगळी फळे तसेच सप्तशृंगीचा मुख्य नैवेद्य हा पुरणपोळीच असतो. सोबतीला खुरासणीची चटणी, वरण, भात, भाजी हे देखील नैवेद्य म्हणून दाखवतात . बारा वाजता महानैवेद्य आरती होते. सायंकाळी 7.30 वाजता शेजारती होते देवीच्या पूजेचा मान देशमुख आणि दीक्षित या घराण्यांना आहे. नवरात्र आणि चैत्र पौर्णिमेला गडावर मोठी गर्दी होते. 

पर्वताच्या शिखरावर चैत्र शुद्ध पौर्णिमेच्या मध्यरात्री दरेगावचे गवळी पाटील कीर्तिध्वज फडकवतात. हा मान त्यांचा असतो. या ध्वजाची सवाद्य मिरवणूक निघते. हा ध्वज ११ मीटर लांबीचा असून केसरी रंगाचा असतो. सप्तश्रृंगी मातेचा ध्वज नेहमी  उत्तरेकडे फडकत राहतो. धर्मशाळेसमोर बांधलेल्या होमकुंडात नवचंडी, शतचंडी आदि यज्ञ होतात. देवीसमोर भक्तांचा गोंधळ चालू असतो. देवी नवसास पावते म्हणून भक्तांचा ओघ येथे सतत सुरु असतो. विशेषत: पुत्रप्राप्तीसाठी स्त्रीया नवस करतात. तसेच इतर पिडा टळावी म्हणून देवीला साकडे घालतात.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने