देशात सर्वांना लागू होणारे लोकसंख्या धोरण हवे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS)

 



ब्युरो टीम : ईशान्येकडील राज्यांमध्येही जनजातीय समुदायाच्या लोकांमध्ये स्वाभिमान जागृती झाल्यामुळे ‘‘मीही हिंदू आहे’’, ही जाणीव जागी झाली आहे, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांनी बुधवारी सांगितले. संघ सरकार्यवाह हे आज प्रयागराज येथील गौहनियामधील जयपुरिया स्कूलच्या वात्सल्य परिसरात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेला संबोधित करत होते. ते म्हणाले, की स्वाभिमान जागृतीमुळेच ईशान्य राज्यांमधील जनजातीय समुदायाच्या लोकांनाही आता संघाशी जोडण्याची इच्छा आहे. ते म्हणाले, की मेघालय आणि त्रिपुरा राज्याताली जनजाती समुदायाचे लोक संघाच्या सरसंघचालकांनाही याच जाणीवेमुळे आमंत्रित करू लागले आहेत. 

प्रयागराज येथे आयोजित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या चार दिवसीय अखिल भारतीय कार्यकारी मंडळाच्या बैठकीच्या (RSS All India working committee meeting at Prayagraj )शेवटीच्या दिवशी दत्तात्रेय होसबाळे यांनी पत्रकारांना सांगितले, की संघ आपल्या स्थापनेच्या शताब्दी वर्षात अनेक आयामांमध्ये कार्यांना गती देत आहे. कोरोना महामारीच्या संकटकाळातही संघाने आपल्या कामांच्या आयामांमध्ये अभूतपूर्व प्रगती केली आहे.  

सरकार्यवाह म्हणाले, की देशातील लोकसंख्येचा विस्फोट चिंताजनक आहे. त्यामुळे या विषयावर समग्रतेने आणि एकात्मतेने विचार करून सर्वांना लागू होणारे लोकसंख्या धोरण आखायला हवे. ते म्हणाले, की धर्मांतरामुळे हिंदूंची संख्या कमी होत आहे. देशाच्या अनेक भागांमध्ये धर्मांतराचे कारस्थान सुरू आहे. काही सीमावर्ती क्षेत्रांमध्ये घुसखोरीही होत आहे. लोकसंख्येच्या असंतुलनामुळे अनेक देशांमध्ये विभाजनाची वेळ आली आहे. भारताची फाळणीसुद्धा लोकसंख्या असंतुलनामुळेच झाली होती, असेही सरकार्यवाह म्हणाले. 

सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे म्हणाले, की 2024 वर्षीच्या अखेरपर्यंत हिंदुस्थानातील सर्व जिल्ह्यांमध्ये शाखा पोहोचविण्याची योजना आखली गेली आहे. काही प्रांतांमध्ये हे कार्य निवडक जिल्ह्यांमध्ये 99 टक्क्यांपर्यंत पूर्ण करण्यात आले आहे. चित्तौड, ब्रज आणि केरळ प्रांतात जिल्हा पातळीपर्यंत शाखा सुरू करण्यात आल्या आहेत. पूर्वी देशभरात संघाच्या 54382 शाखा होत्यास, तर  सध्या 61045 शाखा भरत आहेत. साप्ताहिक मिलनातही 4000 आणि मासिक संघ मंडळात गेल्या एका वर्षात 1800 ने वाढ झाली आहे, असे सरकार्यवाह म्हणाले. 

वर्ष 2025 मध्ये संघाच्या स्थापनेला 100 वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्त संघकार्यासाठी वेळ देण्यासाठी देशभरात निघाले 3000 युवक शताब्दी विस्तारक म्हणून बाहेर पडले आहेत. आणखी 1000 शताब्दी विस्तारक बाहेर पडणार आहेत, असे सरकार्यवाह म्हणाले.  संगमनगरीत आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय कार्यकारी मंडळाच्या बैठकीत लोकसंख्या असंतुलन, महिला सहभाग, धर्मांतर आणि आर्थिक स्वावलंबन अशा महत्त्वाच्या सामाजिक मुद्द्यांवर विस्ताराने चर्चा झाली. तसेच संघकार्याचा विस्तार करण्यासाठी विस्तृत कार्ययोजनेच्या संदर्भात विचार मंथन झाले, असे दत्तात्रेय होसबाळे म्हणाले. 

लोकसंख्येच्या असंतुलनाशी संबंधित एका प्रश्नाच्या उत्तरात सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे म्हणाले, की गेल्या 40-50 वर्षांमध्ये लोकसंख्या नियंत्रणावर भर देण्यात आल्यामुळे प्रत्येक कुटुंबाची सरासरी लोकसंख्या 3.4 पासून कमी होऊन 1.9 एवढी झाली आहे. यामुळे भारतात एक वेळ अशी येईल, की युवकांची संख्या कमी होईल आणि वृद्धांची संख्या अधिक होईल. हे चिंताजनक आहे.  देशाला तरुण देश म्हणून कायम ठेवण्यासाठी संख्या संतुलित ठेवण्यावर त्यांनी भर दिला. दुसरीकडे धर्मांतर आणि बाहेरील घुसखोली यांसारख्या दुष्चक्रामुळे निर्माण होणाऱ्या लोकसंख्या असंतुलनाबाबतही चिंता व्यक्त केली. 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय कार्यकारी मंडळाची बैठक जिल्हा मुख्यालयापासून सुमारे 25 किलोमीटर दूर असलेल्या यमुनेपारच्या गौहनिया येथील वात्सल्य विद्यालय परिसरात आयोजित करण्यात आली होती. पूज्य सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत व माननीय सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांनी रविवारी भारतमातेच्या तसबिरीवर पुष्पार्चन करून बैठकीस आरंभ केला होता. आज बुधवार, 19 ऑक्टोबर रोजी बैठकीचा समारोप झाला.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने