Sitrang Cyclone : ऐन दिवाळीत या राज्यात चक्रीवादळ धडकण्याची शक्यता, महाराष्ट्रावर काय परिणाम होईल ?



ब्युरो टीम :  सध्या महाराष्ट्राला परतीच्या पावसानं झोडपून काढलं आहे. पुण्यात तर पावसानं हाहाकार केला. अनेक ठिकाणी ढगफुटीसदृश्य पाऊस कोसळला आहे. त्यातच आता मोठी बातमी समोर आली आहे. ऐन दिवाळी बंगालच्या उपसागरात  चक्रीवादळ धडकण्याची शक्यता आहे. कोलकता येथील प्रादेशिक हवामान केंद्रानं हा अंदाज वर्तवला आहे. या चक्रीवादळाचा परिणाम म्हणून २३ आणि २४ ऑक्टोबर रोजी पूर्व महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्याच्या परिसरात पावसाची शक्यता आहे.

दरम्यान, या वादळाचं नाव ‘सीतरंग’ ठेवण्यात आलं असून या वादळाची दिशा नेमकी कशी असेल? याबाबत आताच भाष्य करणं खूप घाईचं असेल, असं मत हवामानतज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे.

कोलकाता येथील आयएमडीच्या प्रादेशिक हवामान केंद्रानं आज,मंगळवारी सकाळी बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ धडकणार असल्याची माहिती दिली. सोमवारी दक्षिण अंदमान समुद्र आणि त्याच्या आसपासच्या परिसरात सौम्य चक्रीवादळ निर्माण झाल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. आज सकाळपर्यंत हे वादळ उत्तर अंदमान समुद्र परिसरात होते, अशी माहितीही  हवामान केंद्राने दिली. पुढील ४८ तासांत दक्षिण-पूर्व बंगाल आणि लगतच्या भागत हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. २२ ऑक्टोबरपर्यंत याचं चक्रीवादळात रुपांतर होईल. त्यानंतर हे वादळ पश्चिम-वायव्य दिशेने पुढे सरकण्याची शक्यता आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरात हे चक्रीवादळ आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे,” अशी माहिती कोलकाता येथील हवामान विभागाच्या आरडब्लूएफसी (RWFC) ने जारी केलेल्या अधिकृत निवेदनात दिली आहे. 

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने