सकाळी उत्तर कोरियाने पूर्व समुद्रात बॅलिस्टिक क्षेपणास्त्र (SRBM) डागले, परिस्थिती तणावपूर्ण

 


उत्तर कोरिया अनेक दिवसांपासून क्षेपणास्त्र चाचण्या करत आहे. एकीकडे किम जोंगच्या धमक्या आणि दुसरीकडे क्षेपणास्त्र चाचण्या यामुळे उत्तर कोरियाचा  शेजारील देशाबरोबर असलेला तणाव कधीच कमी झाला नाही. आता पुन्हा एकदा उत्तर कोरियामध्ये सुरू असलेल्या कारवायांमुळे दक्षिण कोरिया चिंतेत आहे. दक्षिण कोरियाच्या  जॉइंट चीफ ऑफ स्टाफच्या म्हणण्यानुसार परिस्थिती अशी झाली आहे की, 10 हून अधिक उत्तर कोरियाच्या युद्धविमानांनी आंतर-कोरियन सीमेजवळ धोकादायक उड्डाणे केल्यानंतर, दक्षिण कोरियाला सीमेवर एफ-३५ लढाऊ विमाने तैनात करावी लागली आहेत.

गुरूवारी सकाळी उत्तर कोरियाने लांब पल्ल्याच्या क्रूझ क्षेपणास्त्राची पहिली चाचणी केल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर दक्षिण कोरियाच्या सीमेजवळून युद्ध विमानेही उडताना दिसली. जेव्हा ती लढाऊ विमाने सीमेच्या अगदी जवळ आली तेव्हा दक्षिण कोरियाने सुरक्षेच्या दृष्टीने F-35 लढाऊ विमाने तैनात केली. सध्या तरी दोन्ही देशांकडून एकही हल्ला झालेला नाही, अशी स्थितीही होताना दिसत नाही. पण सततच्या क्षेपणास्त्र चाचण्यांमुळे दक्षिण कोरिया सावध झाला आहे.

काही दिवसांपूर्वीच उत्तर कोरियाने जपानवर क्षेपणास्त्र डागले होते. यात शेजारील देशाचे कोणतेही नुकसान झाले नसल्याचा दावा करण्यात आला होता, मात्र यामुळे परिस्थिती तणावपूर्ण बनली होती. या क्षेपणास्त्र चाचण्या थांबवण्याचे आवाहन अमेरिका, जपान आणि दक्षिण कोरियाकडून सतत होत आहे व प्रतिउत्तराचे इशारे दिले जात आहेत. परंतु उत्तर कोरिया आपल्या धोरणावर ठाम आहे आणि सातत्याने क्षेपणास्त्रे डागत आहे आज शुक्रवारी सकाळी देखील उत्तर कोरियाने पूर्व समुद्रात एक लहान पल्ल्याचे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र (SRBM) डागले. उत्तर कोरियाकडून ही क्षेपणास्त्रे डागली जात असल्याकडे दक्षिण कोरिया यांच्याकडे चिथावणी देणारे कृत्य म्हणून पाहत आहे. त्याचवेळी, वेगाने बदलणाऱ्या या परिस्थितीमध्ये अमेरिकन लष्करानेही आपल्या मित्र राष्ट्रांशी चर्चा सुरू केली आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने