T20 World Cup 2022 : न्यूझीलंडने श्रीलंकेचा 65 धावांनी पराभव केला

 


T20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022) मध्ये न्यूझीलंडने श्रीलंकेचा 65 धावांनी पराभव केला. आज शनिवारी सिडनी येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात  नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने 20 षटकांत 7 गडी गमावून 168 धावांचे लक्ष्य श्रीलंके समोर ठेवले होते. या प्रत्युत्तरात श्रीलंकेचा संघ 102 धावांत गारद झाला. न्यूझीलंड संघाकडून ग्लेन फिलिप्सने 64 चेंडूत 104 धावांची शानदार खेळी केली.

नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतलेल्या न्यूझीलंडची सुरुवात चांगली झाली नाही आणि पॉवरप्लेमध्ये संघाने अवघ्या 15 धावांत तीन विकेट गमावल्या. यानंतर ग्लेन फिलिप्स (104) आणि डॅरिल मिशेल (२२) यांनी 84 धावांची भागीदारी करत डाव सांभाळला. फिलिप्सने 64 चेंडूंत 10 चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने 104 धावांची शानदार खेळी खेळली. फिलिप्सशिवाय इतर दोनच फलंदाजांना संघाची दोन अंकी धावसंख्या गाठता आली. श्रीलंकेकडून तीक्षा तसेच  धनंजय डी सिल्वा, लाहिरू कुमारा आणि वानिंदू हसरंगा डी सिल्वा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

168 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेच्या संघाची सुरुवात खूपच खराब झाली. श्रीलंकेच्या संघाने अवघ्या 24 धावांत 5 विकेट गमावल्या. एकापाठोपाठ एक विकेट पडल्यामुळे श्रीलंकेचा संघ दडपणाखाली आला आणि यातून सावरला नाही. श्रीलंकेसाठी भानुका राजपक्षे (३४) आणि दासून शनाका (३५) यांच्याशिवाय एकाही फलंदाजाला दोन आकड्यांचा आकडाही गाठता आला नाही. श्रीलंकेचा संपूर्ण संघ 102 धावांत गारद झाला आणि त्यांना 65 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. न्यूझीलंडकडून ट्रेंट बोल्टने ३ बळी घेतले.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने