T20 world cup 2022 : भारतीय संघाची आज खरी कसोटी, दक्षिण आफ्रिकेवर मात करून सेमी फायनल मध्ये जाण्याची संधी



ब्युरो टीम : सलग दोन विजयांसह सेमी फायनलसाठी आपली दावेदारी भक्कम करणाऱ्या भारतीय संघाची आज, रविवारी (३० ऑक्टोबर २०२२) ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेतील सामन्यात तुल्यबळ दक्षिण आफ्रिकेशी गाठ पडणार आहे. या सामन्यात पर्थच्या वेगवान खेळपट्टीवर भारतीय फलंदाजांची खरी कसोटी लागणार आहे. हा सामना जिंकून सेमी फायनलमध्ये आपले स्थान अधिक भक्कम करण्याची संधी भारताकडे असणार आहे. दुसरीकडे, आतापर्यंत एकदाही विश्वचषक स्पर्धा जिंकण्यात यश न आलेल्या दक्षिण आफ्रिका देखील भारताविरुद्धचा आजचा सामना जिंकून सेमी फायनल गाठण्याचा प्रयत्न करेल.

ऑस्ट्रेलिया येथे होत असलेल्या ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने दर्जेदार कामगिरी करताना पहिल्या सामन्यात पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर मात केली. त्यानंतर आघाडीच्या फळीतील फलंदाजांच्या खेळींमुळे दुसऱ्या सामन्यात भारताने तुलनेने दुबळय़ा नेदरलँड्सचा पराभव केला. त्यामुळे चार गुणांसह भारतीय संघ गट-२ मध्ये अग्रस्थानावर आहे. दक्षिण आफ्रिकेच्या संघालाही सूर गवसला आहे. आफ्रिकेचा झिम्बाब्वेविरुद्ध पहिला सामना पावसामुळे पूर्ण होऊ शकला नाही. त्यामुळे त्यांना एका गुणावर समाधान मानावे लागले. त्यानंतर आफ्रिकेने बांगलादेशचा १०४ धावांनी धुव्वा उडवत निव्वल धावगतीत मोठी वाढ केली. त्यामुळे रविवारी होणाऱ्या लढतीत  विजय मिळवणाऱ्या संघाचे उपांत्य फेरीतील स्थान जवळपास निश्चित होईल. पर्थमध्ये काही वर्षांपूर्वीच तयार करण्यात आलेल्या ऑप्टस स्टेडियमवर हा सामना रंगणार आहे. भारतीय वेळेनुसार सायंकाळी साडेचार वाजता या सामन्याचे थेट प्रेक्षपण पाहता येईल. 

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने