पी15बी श्रेणीच्या दुसऱ्या टप्प्यातील "मुरगाव" विनाशिका भारतीय नौदलाला सुपूर्द

 


प्रोजेक्ट 15बी क्लास गाईडेड मिसाईल विनाशिकेचे दुसरे जहाज म्हणजेच यार्ड 12705 (मुरगाव), माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडने (एमडीएल)आज भारतीय नौदलाला सुपूर्द केले आहे.व्हाईस ॲडमिरल नारायण प्रसाद, एव्हीएसएम, एनएम, आयएन (निवृत्त), एमडीएलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक तसेच आरएडीएम सी रघुराम, व्हीएसएम, एमडीएल इथे सीएसओ (तांत्रिक)  यांनी कमांडीग ऑफिसर (डेझिगनेट) कपित भाटीया, एमडीएलचे संचालक तसेच नौदल अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आज अधिग्रहण दस्तावेजांवर स्वाक्षरी केली.

डीएमआर 249ए  हे  स्वदेशी पोलाद ही  विनाशिका बांधण्यासाठी वापरले  असून भारतात बांधलेली ही सर्वात मोठी विनाशिका आहे. याची एकूण लांबी 164 मीटर तर वजन 7500 टनांपेक्षा अधिक आहे.सागरी युद्धात विविध कार्ये आणि मोहिमा यशस्वी करण्यात ही विनाशिका सक्षम आहे. जमिनीवरुन जमिनीवर मारा करणारे स्वनातीत (सुपरसोनिक) ब्राम्होस क्षेपणास्त्र आणि जमिनीवरुन हवेत मारा करणारे लांब पल्ल्याच्या "बराक8" क्षेपणास्त्राने ही विनाशिका सुसज्ज आहे.समुद्राखालील युद्ध क्षमतेचा विचार करता यात स्वदेशी पाणबुडीविरोधी शस्त्रे आणि सेन्सर्स बसवलेले आहेत. विशेषत्वाने विनाशिकेच्या नांगरावर सोनार हम्सा एनजी, अवजड टॉर्पेडो ट्यूब लाँचर्स आणि एएसडब्लू रॉकेट लाँचर्स बसवले आहेत.

नौदलातील आधीच्या विनाशिका आणि युद्धनौकांच्या क्षमतांपेक्षा ही लक्षणीयरीत्या अधिक अष्टपैलू आहे.  शत्रूच्या पाणबुड्या, पृष्ठभागावरील युद्धनौका, जहाजविरोधी क्षेपणास्त्रे आणि लढाऊ विमानांविरुद्ध मुरगावची सर्वांगीण क्षमता ही जहाजांच्या मदती शिवाय स्वतंत्रपणे कार्य करण्यास आणि नौदल कृती दलाचे प्रमुख म्हणून कार्य करण्यास ती सक्षम ठरेल.

ही विनाशिका एकूण 312 कर्मचाऱ्यांना सामावून घेऊ शकते, त्याची क्षमता 4000 नॉटिकल मैल आहे आणि ती नियोजित मोहिमेपेक्षा विस्तारित मोहिम वेळेसह ठराविक 42 दिवसांची मोहीम पार पाडू शकते. विनाशिकेची पोहोच आणखी वाढवण्यासाठी त्यावर दोन हेलिकॉप्टर आहेत. गीगाबाइट इथरनेट आधारित शिप डेटा नेटवर्क (जीईएसडीएन), युद्ध व्यवस्थापन प्रणाली (सीएमएस), ऑटोमॅटिक पॉवर मॅनेजमेंट सिस्टम (एपीएमएस) आणि इंटिग्रेटेड प्लॅटफॉर्म मॅनेजमेंट सिस्टम (आयपीएमएस) यासारख्या अत्याधुनिक डिजिटल नेटवर्कसह विनाशिकेत उच्च दर्जाची ऑटोमेशन व्यवस्था आहे.

पी15बी वर्गाच्या विनाशिकेत 72% स्वदेशी सामग्री आहे. तिच्या पूर्वसुरींच्या म्हणजेच पी15ए (59%) आणि पी15 (42%) यांच्या तुलनेत हे प्रमाण खूपच जास्त आहे. यावरुनच सरकार ‘मेक इन इंडिया’ कार्यक्रमावर किती भर देत आहे लक्षात येते.  पी15बी (विशाखापट्टणम) ही पहिली विनाशिका गेल्या वर्षी 21 नोव्हेंबर 2021 रोजी कार्यान्वित झाली. तिसऱ्या विनाशिकेचे (इम्फाळ) जलावतरण 20 एप्रिल 2019 रोजी करण्यात आले होते आणि चौथ्या विनाशिकेचे (सुरत) जलावतरण 17 मे 2022 रोजी  करण्यात आले होते.

देशाच्या प्रगतीशील स्वदेशी युद्धनौका आणि पाणबुडी निर्माण कार्यक्रमात एमडीएल नेहमीच आघाडीवर राहिले आहे. आधुनिक काळातला एमडीएलचा इतिहास, हा जणू भारतातील स्वदेशी युद्धनौका आणि पाणबुडी बांधणीचाच इतिहास आहे. त्यामुळेच, ‘भारतीय युद्धनौका आणि पाणबुडीचे शिल्पकार’ अशी सार्थ उपाधी त्यांनी संपादन केली आहे.


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने